पतंगाच्या दोरीवर माणुसकी अडकू देऊ नका !

नायलॉन मांजाविरोधात एनसीसी विद्यार्थ्यांचा भावनिक संदेश

    दिनांक :07-Jan-2026
Total Views |
वाशीम,
anti nylon manjha campaign आनंद, उत्साह आणि परंपरेचा उत्सव असलेला पतंगोत्सव जर नायलॉन मांजामुळे रक्तरंजित होत असेल, तर तो आनंद शोकात बदलण्यास वेळ लागत नाही. नायलॉन मांजा हा कायद्याने गुन्हा असून तो केवळ मानवी जीवनालाच नव्हे तर पर्यावरणाचे संतुलन राखणार्‍या मुया पशुपक्ष्यांच्या जिवालाही गंभीर धोका निर्माण करतो. तलवारीसारखा धारदार असलेला हा मांजा क्षणात आयुष्य उध्वस्त करू शकतो, ही बाब लक्षात घेऊन पतंग उडवितांना नायलॉन व चायनीज मांजाचा वापर करू नका, असे कळकळीचे आणि भावनिक आवाहन एनसीसी विद्यार्थ्यांनी केले आहे.
 

anti nylon manjha campaign 
६ जानेवारी रोजी स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयात एनसीसीच्या वतीने पतंगोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा न घेता समाजप्रबोधनाचा ध्यास घेतला. मकरसंक्रांतीच्या पर्वावर जवळपास महिनाभर शहरात पतंगोत्सव साजरा केला जातो. मोठ्या उत्साहात मुलं सहभागी होतात. मात्र, नायलॉन व चायनीज मांजाच्या वाढत्या वापरामुळे अपघातांची संख्या चिंताजनक आहे. नुकतेच शाळेतील दोन विद्यार्थ्यांना याची झळ बसली असून, एका विद्यार्थ्याच्या मानेवर १२ टाके तर दुसर्‍या विद्यार्थ्याच्या बोटाला सात टाके बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर एनसीसी विद्यार्थ्यांनी मानव, पशु आणि पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असलेल्या नायलॉन व चायनीज मांजाचा वापर न करण्याची शपथ घेतली. एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पतंगांवर अक्षरलेखन व चित्रांच्या माध्यमातून नायलॉन मांजा नको, सुरक्षित पतंगोत्सव हवा असा प्रभावी संदेश दिला.
या स्पर्धेत अनुजा काकडे हिने प्रथम, समर्थ जोशी याने द्वितीय तर कार्तिकी मारवाडी हिने तृतीय क्रमांक पटकावला. अनुकल्प तायडे व सेजल सरनाईक यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. एकूण ६८ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या सामाजिक जाणीव जागवणार्‍या उपक्रमाबद्दल बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबन बिल्लारी, उपमुख्याध्यापक सुनील दंभीवाल तसेच एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. आनंदाच्या पतंगोत्सवात माणुसकी, संवेदनशीलता आणि जबाबदारी जपली गेली तरच हा सण खर्‍या अर्थाने उत्सव ठरेल, असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.