गडचिरोली,
Gadchiroli Congress protest, गडचिरोली जिल्हा हा दुर्गम व मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवले असले, तरी प्रत्यक्षात आजही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व पायाभूत सुविधा पूर्णतः विकसित झालेल्या नाहीत. याचाच एक जीवंत उदाहरण म्हणजे तीन दिवसापूर्वी एका गरोदर मातेला सुविधेअभावी जीव गमवावा लागला. त्यामुळे या मातेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्रम्हणवाडे यांच्या नेतृत्वात येथील इंदिरा बुधवारी, 7 जानेवारी रोजी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात दिवसेंदिवस अपुरे रस्ते व आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दुर्घटना घडत असून नुकताच एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे. शासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम व सुरळीत करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते तयार करून वाहतूक व्यवस्था सुधारावी. तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. या धरणे आंदोलनादरम्यान कावळ ऍम्ब्युलन्सची प्रतिकृती दाखवत काँग्रेसने जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्यवस्थेचा निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष अॅड. रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वासेकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, पंचायत राज सेल अध्यक्ष कविता भगत, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुस्पलता कुमरे, अनिल कोठारे, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, भूपेश कोलते, विनोद लेनगुरे, उत्तम ठाकरे, दिवाकर निसार, दिलीप घोडाम, ढिवरू मेश्राम, कविता उराडे, रिता गोवर्धन, पोर्णिमा भडके, शितल ठवरे, शेवंता हलामी, जितेंद्र मनगटे यारसह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.