अंबरनाथ,
12 Congress corporators join BJP महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बीएमसी निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सर्व १२ निलंबित नगरसेवक भारतीय जनता पार्टीत दाखल झाले असून, या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशानंतर रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत भाजपाची विकासाभिमुख आणि जनता-केंद्रित कार्यशैली अनेकांना आकर्षित करत असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, उदया ग्रुपचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी विकासाचे प्रतीक असलेले ‘कमळ’ खांद्यावर घेत भाजपामध्ये प्रवेश केला असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या वेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदाताई भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत या नगरसेवकांनी यापूर्वी भाजपाशी युती साधत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ या नावाने स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. मात्र, नवीन पक्ष स्थापन केल्यामुळे काँग्रेसने या सर्व नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. आता हेच सर्व १२ नगरसेवक थेट भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकांत शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवत आघाडी घेतली होती. एकूण २७ जागा जिंकूनही शिवसेना बहुमतापासून चार जागा दूर राहिली. या निवडणुकीत भाजपाला १४, काँग्रेसला १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या होत्या. या राजकीय चित्रात भाजपाने महत्त्वाची रणनीती आखली. सर्वाधिक जागा मिळवूनही सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता लक्षात घेता,भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याने या तिन्ही पक्षांची एकत्रित संख्या ३२ वर पोहोचली आणि बहुमताचा आकडा सहज पार करण्यात आला. या घडामोडींनंतर आता बीएमसीसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.