मुंबई,
A setback for Ajit Pawar राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये निवडणुकीचे गणित बदलू शकणारी घडामोड समोर आली आहे. या दोन्ही महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र, आता त्यांच्या रणनीतीला धक्का देणारा निर्णय युतीतूनच समोर आला आहे.
दलित मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अजित पवार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबत युती केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या गटाला काही जागाही देण्यात आल्या होत्या. मात्र, आरपीआय (खरात गट)चे प्रमुख सचिन खरात यांनी अचानकपणे महापालिका निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे अजित पवार यांच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला असून, विशेषतः दलित मतदारांबाबतची गणिते बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सचिन खरात यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, युतीत त्यांना सन्मानपूर्वक जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेतून आपण बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही उमेदवाराला आपण पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे जाहीर केले. या घडामोडीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक चित्र बदलण्याची शक्यता असून, अजित पवार यांच्यासमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. प्रचाराच्या ऐन तोंडावर युतीतील या फाटाफुटीचा नेमका काय परिणाम होणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.