मोर्शी शहराचा पाणी पुरवठा बंद होणार

अप्पर वर्धा धरणाचे देयके थकीत

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
मोर्शी, 
morshi-water-supply-suspended : अवघ्या अमरावती जिल्ह्याची तहान भागवणार्‍या सिंभोरा येथील नलदमयंती जलाशयाच्या किनार्‍यावर असलेल्या मोर्शी शहराचा पाणी पुरवठा बंद होण्याची परिस्थिती नगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे निर्माण झाल्याने मोर्शीकर जनता विवंचनेत पडली आहे.
 
 
 
k
 
 
 
मोर्शी नगरपालिकेच्या व्यवस्थापन शून्य नियोजनामुळे मोर्शी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे देयकापोटी तब्बल १ कोटी ६० लाख १२ हजार २०० रक्कम थकीत असल्याचे व सदर रक्कम त्वरित न भरल्यास अप्पर वर्धा धरणातून मोर्शी नगर परिषदेला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस नगर परिषदेला १ जानेवारीला पाठवली आहे. थकीत रक्कम न भरल्यास १५ तारखेपासून पाणीपुरवठा बंद करण्याची ताकीद अप्पर वर्धा प्रशासनाने दिलेली आहे.
 
 
यासंदर्भात अप्पर वर्धा प्रशासनाने मोर्शी नगरपरिषदेला वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता सक्त कारवाई केल्या जाईल, असे त्यांनी या नोटीसद्वारे बजावले आहे. नुकताच एक जानेवारीला मोर्शी नगरपरिषदेचा कार्यभार सांभाळलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतीक्षा गुल्हाने यांच्यासमोर हे मोठे आव्हानच असल्याचे दिसत आहे.
 
 
युद्धस्तरावर उपाययोजना करू
 
 
गेली चार वर्षापासून मोर्शी नगरपरिषदेला नगराध्यक्ष व नगरसेवक नसल्याने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण नुकताच मोर्शी न.प.चा कार्यभार सांभाळला असून यावर काय उपाय योजना करता येईल ती युद्धस्तरावर करून मोर्शीकर जनतेला पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवणार नाही.
-प्रतीक्षा गुल्हाने
नगराध्यक्षा, मोर्शी