मुंबई,
Amruta Khanvilkar मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नव्या वर्षाची सुरुवात अमृताने अत्यंत दमदार पद्धतीने केली असून ती लवकरच बहुप्रतीक्षित वेब सीरिज ‘तस्करी’मध्ये अॅक्शन भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सीरिजचा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ‘तस्करी’ येत्या 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
‘तस्करी’ ही एक थरारक आणि अॅक्शनने भरलेली वेब सीरिज असून, यात बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर पाहता ही सीरिज तस्करीच्या जगतातील गुंतागुंत, तपास यंत्रणांची धडपड आणि वेगवान घटनांनी भरलेली असल्याचे दिसून येते.
या वेब सीरिजबाबत Amruta Khanvilkar आणि स्वतःच्या भूमिकेबद्दल बोलताना अमृता खानविलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, ‘तस्करी’चा प्रवास तिच्यासाठी अतिशय खास ठरला आहे. 2025 च्या सुरुवातीला या सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती आणि 2026 या नव्या वर्षाची सुरुवातच या सीरिजच्या रिलीजने होत आहे, यापेक्षा सुंदर सुरुवात असू शकत नाही. संपूर्ण अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी तिला औपचारिक ऑडिशन द्यावे लागले नाही. कास्टिंग डायरेक्टर विकी सदानाह यांच्या माध्यमातून नीरज पांडे यांची भेट झाली, एका सीनचे सादरीकरण झाले आणि तिथेच तिची निवड निश्चित झाली.
‘तस्करी’ ही अमृताच्या कारकिर्दीतील पहिलीच अॅक्शन वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये ती ‘मिताली’ नावाच्या कस्टम्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ही व्यक्तिरेखा खंबीर, धाडसी आणि तपास पथकातील एक महत्त्वाची सदस्य आहे. या भूमिकेसाठी अमृताने अनेक अॅक्शन सीन केले असून, हा तिच्या अभिनय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे तिने नमूद केले. या भूमिकेमुळे स्वतःचा एक नवा पैलू अनुभवायला मिळाल्याचेही तिने सांगितले.नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याचा अनुभवही अमृतासाठी खास ठरला आहे. नीरज पांडे एखादा सीन ज्या पद्धतीने विचारात घेतात आणि साकारतात, ते अत्यंत प्रेरणादायी असल्याचे अमृताने सांगितले. त्यांच्या सेटवर सतत ऊर्जा आणि वेग जाणवतो. लांबलचक संवाद, अनेक हालचाली आणि एका फ्रेममध्ये अनेक कलाकार असलेले प्रसंग जणू रंगभूमीवर काम करत असल्याचा अनुभव देतात, असे ती म्हणाली.
विशेष म्हणजे ‘तस्करी’ हा अमृता खानविलकरचा नेटफ्लिक्सवरील पहिलाच प्रोजेक्ट आहे. नेटफ्लिक्ससारख्या जागतिक प्लॅटफॉर्मवर आणि नीरज पांडे यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा योग जुळून आल्याने ती अत्यंत आनंदी आहे. मुंबई विमानतळावर झालेल्या शूटिंगचा अनुभव आणि प्रत्यक्ष कार्यरत असलेली संपूर्ण यंत्रणा पाहणे तिच्यासाठी विलक्षण होते, असेही तिने सांगितले.दरम्यान, ‘तस्करी’नंतर अमृता खानविलकर आणखी एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 23 जानेवारीपासून ती डिस्नी हॉटस्टारवरील ‘स्पेस जेन – चंद्रयान’ या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. एकामागोमाग एक दमदार प्रोजेक्ट्समुळे अमृता खानविलकर 2026 मध्येही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.