नवी दिल्ली,
Anil Agarwal's son has passed away वेदांता समूहाचे अध्यक्ष आणि देशातील नामवंत उद्योजक अनिल अग्रवाल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत दुर्दैवी निधन झाले. अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याने उद्योगजगतात आणि समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निवेश अमेरिकेत स्कीइंग करत असताना गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी न्यूयॉर्कमधील माउंट सायनाय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. अनिल अग्रवाल यांनी बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता ‘एक्स’वर पोस्ट करत ही दुःखद बातमी जगासमोर मांडली. आपल्या आयुष्यातील हा सर्वात काळा दिवस असल्याचे त्यांनी नमूद करत, मुलाच्या आठवणींनी मन हेलावून टाकले आहे, असे शब्दांत व्यक्त केले.

भावनिक पोस्टमध्ये अनिल अग्रवाल यांनी एक महत्त्वाचा निर्णयही जाहीर केला. त्यांनी आपल्या कमाईपैकी ७५ टक्के रक्कम समाजासाठी दान करण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आणि हे वचन आपण मुलाला दिले होते, ते पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनी त्यांचे धैर्य आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. या दुःखद घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अग्निवेश अग्रवाल यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक आहे. अनिल अग्रवाल यांच्या भावनिक श्रद्धांजलीतून त्यांच्या दुःखाची खोली स्पष्टपणे जाणवते. या कठीण काळात कुटुंबाला धैर्य आणि शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.
अग्निवेश अग्रवाल यांचा जन्म ३ जून १९७६ रोजी पाटणा येथे झाला होता. त्यांनी अजमेर येथील प्रतिष्ठित मेयो कॉलेजमधून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी उद्योगविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वेदांता समूहाशी संलग्न तलवंडी साबो पॉवर लिमिटेडच्या संचालक मंडळावर त्यांनी काम केले होते. फुजैराह गोल्डच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती, तसेच हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.