सर्वेक्षण की कुळाचार!

भंडारा जिल्ह्यात केवळ १४ हजार एकल महिला

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
भंडारा,
single women survey जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील एकल महिलांच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्यात केवळ १४ हजार २१० एकल महिलांची नोंद झाली आहे. राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत लहान असलेल्या जिल्ह्यांमध्ये एकल महिलांची संख्या मोठी असताना भंडारा जिल्ह्यातच अत्यंत कमी नोंद झाल्याने सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे थातूरमातूर आणि ढिसाळ पद्धतीने सर्वेक्षण झाल्याचा आरोप एकल महिला पुनर्वसन समितीचे प्रणेते हेरंब कुळकर्णी यांनी केला आहे. ही आकडेवारी निराशाजनक असून फेर सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.
 

single women survey 
साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य ननिमंत्रक, ज्येष्ठ समाजसेवक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांनी राज्यात एकल महिलांचे सर्वेक्षण व्हावे ही मागणी लावून धरली. त्यानंतर संपूर्ण राज्यात एकल महिलांच्या सर्वेक्षणाची मोहीम जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आली. भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी एकल महिलांच्या सर्वेक्षणासंदर्भात आदेश पारित केले. ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांमार्फत गावपातळीवर विधवा, घटस्फोटीत व परित्यक्ता व अविवाहित महिलांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले. २५ ऑक्टोबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करायचे होते मात्र अत्यंत कासवगतीने हे सर्वेक्षण ३१ डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाले. तीन महिने चाललेले सर्वेक्षण अत्यंत चोखपणे आणि गुणवत्तापूर्ण केले जाईल अशी अपेक्षा केली जात होती मात्र सर्वेक्षणाअंती भंडारा जिल्ह्यात केवळ १४ हजार २१० एकल महिलांची नोंद करण्यात आली. यात भंडारा १,९०१, मोहाडी ३३०९, तुमसर २२७५, साकोली २०७५, लाखनी १५७८, पवनी १९६६, लाखांदूर ११०६ विधवा, घटस्फोटीत व परित्यक्ता व अविवाहित महिलांचा समावेश आहे.
 
 
उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत छोटा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकल महिलांची संख्या ३४०००,गडचिरोली जिल्ह्यात २५००० तर हिंगोलीमध्ये २७००० एवढी असल्याचे सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. लोकसंख्येच्या तुलनेने लहान असलेल्या जिल्ह्यांमध्ये एकल महिलांची संख्या मोठी असताना भंडारा जिल्ह्यात ही संख्या इतकी कमी कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकल महिलांची आकडेवारी बघता सर्वेक्षण गांभीर्याने झालेले नसल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.भंडारा जिल्ह्यात १२५० अंगणवाडी आहेत. मग प्रत्येक गावात फक्त ११ एकल महिला आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
एकीकडे एकल महिलांची single women survey  संख्या वर्षागणिक वाढतेय, असं अधिकृत आकडेवारीतून पुढे आलेले असताना भंडारा जिल्ह्यात मात्र ही संख्या अत्यंत कमी असणे ही कुणालाही न पचणारी गोष्ट आहे. भारतीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार एकल महिलांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकल महिलांची संख्या २००१ मध्ये देशात ५ कोटी १२ लाख होती, ती २०११ मध्ये ७ कोटी १४ लाख इतकी झाली होती. एकट्या महाराष्ट्रात २०११ साली एकल महिलांची संख्या ५४ लाखांच्या घरात होती. आता अंदाजे ८० लाखांहून अधिक ‘एकल महिला’ असल्याचे निरीक्षण ‘साऊ एकल महिला समिती’चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी नोंदवले आहे. राज्याच्या लोकसंख्येच्या १२ टक्के ‘एकल महिला’ आहेत.
 
 
एकीकडे एकल single women survey महिलांची संख्या वाढत असताना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा त्यांना मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांची धडपड चालली आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात सर्वेक्षण करताना केवळ कुळाचार करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक एकल महिला शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण अत्यंत थातूरमातूर पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी चुकीची माहिती भरण्यात आली आहे. गाव पातळीवर जशी माहिती संकलित करण्यात आली तशीच्या तशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भरली. त्यामध्ये आलेली आकडेवारी तपासून घेणे जिथे कमी भरते तिथे पुन्हा सर्वेक्षण करायला लावणे ही महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी होती असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
लोकसत्ताशी बोलताना हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले की, एकल महिलांची इतकी कमी संख्या दाखवणे याचा अर्थ सर्वेक्षण गांभीर्याने झालेले नाही. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सर्वेक्षण सुरू आहे. अगदी छोट्या जिल्ह्यातही ३० हजारापेक्षा जास्त संख्या निघताना राज्यातील सर्वात कमी संख्या भंडारा जिल्ह्यात निघाली. हे अतिशय निराश करणारे आहे. राज्य व जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या दोन्हीही अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी यांनी सांगून सुद्धा सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे गरीब एकल महिला योजनांपासून वंचित राहणार आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी फेर सर्वेक्षण आदेश देणे गरजेचे आहे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.