नवी दिल्ली,
Bomb threats to courts गुरुवारी देशभरातील अनेक जिल्हा न्यायालयांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या. बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील न्यायालयांत घबराट पसरली असून सुरक्षेच्या कारणास्तव सर्व न्यायालय परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला. उपस्थित न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मध्यप्रदेशातील रेवा जिल्हा आणि छत्तीसगडमधील बिलासपूर व राजनांदगाव जिल्हा न्यायालयांना धमकीचे ईमेल प्राप्त झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि बॉम्बशोधक पथकांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली, श्वान पथकांचा देखील वापर केला गेला. अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

बिहारमध्ये पटना, गया आणि किशनगंज जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. पटना जिल्हा न्यायालय परिसरात आरडीएक्स स्फोटक असल्याचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. गया सिव्हिल कोर्ट परिसर रिकामा करण्यात आला व बॉम्ब स्कॉडला घटनास्थळी पाठवण्यात आले. किशनगंज न्यायालयात देखील घबराट पसरली असून परिसरातील दरवाजे बंद करण्यात आले. पंजाबमध्ये रूपनगर, श्री आनंदपूर साहिब, फिरोजपूर आणि मोगा जिल्हा न्यायालयांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. लुधियानामध्ये मॉक ड्रिल करून सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली.
सायबर सेल ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहे आणि तांत्रिक तपास सुरू आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार हा अफवा पसरवण्याचा किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो, परंतु सुरक्षा यंत्रणांनी कोणतीही शक्यता नाकारली नाही. पुढील सूचना येईपर्यंत सामान्य न्यायालयीन कामकाज विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. देशातील न्यायालयीन परिसरातील सुरक्षेवर तणाव वाढल्याने संबंधित राज्यांच्या पोलिसांनी सुरक्षा अधिक कडक केली आहे आणि तपास सुरू ठेवला आहे.