चंद्रपूर,
sudhir-mungantiwar : चंद्रपूरच्या आध्यात्मिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. लखमापूर हनुमान मंदिर व श्रीराम कथा सेवा समितीच्या वतीने 14 ते 22 जानेवारी 2026 पर्यंत दररोज दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या वेळेत ‘लखमापूर धाम’ (चांदा क्लब ग्राउंड) येथे होणारी श्रीराम कथा श्री राजनजी महाराज यांच्या अमृतमय वाणीने नागरिकांसमोर प्रवाहित होईल. या आध्यात्मिक कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथे पत्रपरिषदेत केले.

यावेळी आ. मुनंटीवार यांच्यासह चंदनसिंग चंदेल, राजेंद्र गांधी, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रशांत कोलप्याकवार, हरिश भट्टा, उमाशंकर सिंग, दिनेश नथवानी, विजय शुक्ला आदी उपस्थित होते. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, श्री राजनजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा व विद्वत्तेचा उद्भूत संगम आहे. हा कार्यक्रम संस्कारांच्या पुनर्जागरणाचा एक महोत्सव ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे जन्मलेले व उत्तर प्रदेशातील बलिया येथील संस्कारांनी घडलेले महाराज यांनी बालपणापासूनच रामायण व अध्यात्माना आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. शास्त्रीय गायनाचे शिक्षण व रामचरितमानसावरील अपार प्रेमामुळे ते एक अद्वितीय कथावाचक म्हणून ओळखले जातात. महाराजांनी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा तसेच आखाती देशांमध्येही श्रीराम कथा प्रवाहित केली आहे. सामाजिक माध्यमांवर त्यांचे प्रवचन सुप्रसिध्द असून, त्यामुळे युवक सनातन संस्कृतीशी जोडले जात आहेत. राजनजी महाराज यांच्या स्वरात साकारलेली शेकडो भजने जसे की, ‘राम की भक्ति में’ आणि रामचरितमानसाच्या चौपायांचे गायन थेट हृदयाला स्पर्श करते. ते कथेला वर्तमान जीवनातील समस्यांशी जोडतात, असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
आ. सुधीर मुनगंटीवार व सपना मुनगंटीवार यांच्या संरक्षणाखाली तसेच श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष हरीश भट्टड व समिती सदस्यांच्या सहकार्याने या भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात येत आहे. लखमापूर धाम (चांदा क्लब ग्राउंड) येथे 10 हजाराहून अधिक श्रद्धाळूंना बसण्याची व्यवस्था असलेला वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच सुलभ प्रवेश-निर्गमन व्यवस्था करण्यात आली आहे.
13 जानेवारीला चंद्रपुरात भव्य शोभायात्रा
कथेपूर्वी 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता श्री नक्ष्मी नारायण मंदिरातून एक भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत सुमारे 7 हजारहून अधिक भक्त सहभागी होतील, ज्यामध्ये 500 मातृशक्ती पारंपरिक वेशभूषेत कलश धारण करून सहभागी होणार आहे. हजारो युवकांची टोळी, भजन मंडळ्या आणि भव्य देखाव्यांमुळे चंद्रपूरच्या रस्त्यांना ‘अयोध्यामय’ स्वरूप प्राप्त होईल, अशीही माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली.