उंबर्डा बाजार,
Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांनी केले. सुकळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील, कारंजा गटविकास अधिकारी पुनम राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी घुगे, बाळकृष्ण अवगण, साखरे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे समाजशास्त्रज्ञ रविचंद्र पडघान उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकार्याना स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने सुकळी ग्रामपंचायतीने अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून, अभियानात यशस्वी होण्यासाठी करावयाच्या तयारीबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
सुकळी गावातील लोकसहभाग व सकारत्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी घरकुल योजनांची पाहणी करून बचत गटातील महिलांशी संवाद साधला यावेळी उपस्थित सरपंच सविता वानखडे आणि ग्रामपंचायत अधिकारी नरेश गजभिये यांनी दिलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील आणि गटविकास अधिकारी पुनम राणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन केले.कोणतेही अभियान यशस्वी होण्यासाठी गावातील प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी चौका-चौकात बॅनर, दवंडी, शाळा, बचतगट व भजनी मंडळांच्या माध्यमातून जनजागृती करावी. प्रत्येक उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.