तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
contaminated-water-girinagar : यवतमाळ शहरातील गिरीनगर परिसरात नाल्यालगत गेलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या घरात अत्यंत दूषित पाणी पोहोचत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्तींना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी नगरसेवक पिंटू बांगर यांनी जीवन प्राधिकरणकडे केली आहे.
गिरीनगर भागातील फुटलेल्या पाईपलाईनद्वारे सुमारे 100 घरांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिकांना पोटदुखी, जुलाब, उलटी, मळमळ यांसारख्या तक्रारी जाणवत होत्या. या पृष्ठभूमिवर येथील रहिवासी दिनकर कुंदोजवार यांनी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, यवतमाळ येथे पाण्याचा नमुना तपासणीसाठी दिला. सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात हे पाणी पिण्यास पूर्णतः अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवालानुसार पाण्यात कोलोफॉर्म्स 16 पेक्षा अधिक आढळले असून, तसेच थर्मोटोलरंट कोलोफॉर्म्स 03 आढळल्याची नोंद आहे. कोलोफॉर्म्स हे पाण्यात मलमूत्रजन्य दूषितता असल्याचे दर्शविणारे जिवाणू असून, थर्मोटोलरंट कोलोफॉर्म्स हे थेट मानवी किंवा प्राण्यांच्या विष्ठेपासून निर्माण होणारे जिवाणू असल्यामुळे पाणी आरोग्यास अतिशय घातक ठरत आहे.
या अहवालामुळे गिरीनगर परिसरात नाल्यातून फुटलेल्या पाईपलाईनमुळे अत्यंत घाणेरडे व विष्ठाजन्य दूषित पाणी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे पाणी पिल्यास कॉलरा, टायफॉईड, कावीळ, अतिसार यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रणच ठरणार आहे.
नगरसेवकांनी घेतली तातडीची दखल
या परिसरातील सौरव राऊत तसेच इतर नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक नगरसेवक पिंटू बांगर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी थेट जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत उमप यांच्याकडे संपर्क साधून जुनी व फुटलेली पाईपलाईन तातडीने बदलून देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने विलंब न करता पाईपलाईन बदलून सुरक्षित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी जोरदार मागणी गिरीनगर परिसरातून होत आहे.