चंद्रपूर,
stray-dogs : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वन्यजीवांना धोका वाढला आहे. या कुत्र्यांनी हरिण, ससा, मोर, कोल्हा आणि छोटे पक्षी यासारख्या प्राण्यांवर हल्ले करून ठार केले आहेत. तसेच काही प्राण्यांना रेबीज आणि डिस्टेंपरसारखे घातक रोग पसरले आहेत. यावर उपाय म्हणून व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने 95 गावांमध्ये विशेष मोहीम राबवली असून, जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सुमारे 2 हजार 271 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण पूर्ण झाले आहे.
प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 आणि प्राणी जन्म नियंत्रण नियम 2023 नुसार हे कार्यक्रम चालवले जात आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ही व्याघ्र प्रकल्प परिसरात कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण बंधनकारक केले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये 95 गावे येतात. या मोहिमेत व्याघ्र प्रकल्प प्रशासन, पीपल फॉर अॅनिमल्स (वर्धा) आणि वाइल्ड सीईआर संस्था यांचा सहभाग आहे. प्राधान्याने जेथे कुत्र्यांची संख्या जास्त आहे आणि नागरिकांना त्रास होत आहे अशा गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
सूर्योदयापासून जाळ्यांच्या मदतीने कुत्र्यांना मानवीय पद्धतीने पकडले जाते. त्यांना निर्बीजीकरण केंद्रात नेले जाते, जिथे पशुवैद्यकीय अधिकीर आरोग्य तपासणी करतात. गरोदर मादी, दूध पाजणार्या माता, आजारी, कमकुवत किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या पिल्लांची शस्त्रक्रिया टाळली जाते. फक्त निरोगी कुत्र्यांवरच नसबंदी केली जाते. शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी, औषधोपचार करून ते पूर्ण बरे झाल्यावर मूळ ठिकाणी सोडले जातात. सर्व कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस आणि डिस्टेंपर, डायरिया यांसारख्या रोगांविरोधी लस दिली जाते. त्वचारोग असल्यास उपचार आणि जंतनाशकही दिले जाते. जानेवारी 2025 पासून पीपल फॉर अॅनिमल्सने 1 हजार 889 तर वाइल्ड सीईआरने 382 कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले आहे. एकूण 2 हजार 271 कुत्र्यांवर काम पूर्ण झाले. 31 मार्च 2026 पर्यंत 100 टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रकल्पाचे लक्ष्य आहे.
कुत्र्यांमुळे वन्यजीवांना धोकाः प्रभू नाथ शुक्ल
भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना तसेच मानवी आरोग्याला धोका आहे. रेबीजसारखे रोग पसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम कायमस्वरूपी राबवला जाईल, जेणेकरून भविष्यात या समस्यांना प्रभावी आळा बसेल, अशी प्रतिक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली.