ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
पुणे,
Dr. Madhav Gadgil has passed away भारताच्या पर्यावरण चळवळीतील एक अग्रणी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, विचारवंत आणि पश्चिम घाट संवर्धनासाठी देशभरात ओळखले जाणारे डॉ. माधव गाडगीळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. अल्पशा आजाराने त्रस्त असलेले डॉ. गाडगीळ यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी डॉ. शिरीष प्रयाग रुग्णालयात रात्री सुमारे ११ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण संरक्षण, जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी आयुष्यभर झटणारा एक निर्भीड, संवेदनशील आणि मार्गदर्शक आवाज हरपला आहे.
 
 

Dr. Madhav Gadgil  
डॉ. माधव गाडगीळ हे भारतीय पर्यावरणशास्त्रातील अत्यंत मान्यवर नाव होते. पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे शहाणपणाने व्यवस्थापन आणि विकास प्रक्रियेत स्थानिक समुदायांचा सहभाग असावा, यावर त्यांनी सातत्याने भर दिला. पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ पॅनेलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सादर केलेल्या अहवालामुळे देशभरात मोठी चर्चा झाली होती. पर्यावरण आणि विकास यामध्ये संघर्ष न करता समतोल साधता येतो, ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. जंगल, नद्या, पर्वतरांगा आणि मानवी समाज यांचा अतूट संबंध त्यांनी आपल्या संशोधनातून अधोरेखित केला. पर्यावरणीय धोरणे ठरवताना स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे ते नेहमी सांगत. केवळ शासकीय निर्णयांवर अवलंबून न राहता लोकसहभागातूनच पर्यावरण संरक्षण यशस्वी होऊ शकते, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी शेतकरी, आदिवासी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायांशी थेट संवाद साधून पर्यावरणाबाबत जागृती निर्माण केली.
 
शैक्षणिक क्षेत्रातही डॉ. गाडगीळ यांचे योगदान मोलाचे होते. भारतीय विज्ञान संस्थेत (IISc) प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन आणि संशोधन केले. लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन या क्षेत्रांतील त्यांचे संशोधन दिशादर्शक ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आणि संशोधक घडले असून आज देशातील अनेक नामवंत पर्यावरण अभ्यासक हे त्यांचे शिष्य आहेत. ते पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचे सदस्यही होते. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी त्यांनी मांडलेली वैज्ञानिक, संतुलित आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणे आजही अभ्यासली जातात. त्यांच्या अहवालामुळे पर्यावरण संरक्षणावर देशव्यापी चर्चा सुरू झाली आणि पर्यावरणीय प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी बदलली.
 
डॉ. गाडगीळ यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार देण्यात आले. १९८१ मध्ये पद्मश्री, २००६ मध्ये पद्मभूषण, १९८६ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, २०१५ मध्ये टाइलर पुरस्कार आणि २०२४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. त्यांच्या निधनावर पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पर्यावरणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारा, अभ्यासपूर्ण विचार करणारा आणि निसर्गाशी माणसाचा नातेसंबंध अधोरेखित करणारा एक महान शास्त्रज्ञ आज देशाने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.