कोलकाता,
ed raids पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या राजकीय रणनीती आणि निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित आय-पीएसी (I-PAC) संस्थेच्या कोलकात्यातील साल्ट लेक सेक्टर-५ येथील कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गुरुवार, ८ जानेवारीच्या सकाळपासून ईडीची कारवाई सुरू असून, कंपनीचे मालक प्रतीक जैन यांच्या लाउडन स्ट्रीट येथील कार्यालयावरही एकाचवेळी छापेमारी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा घोटाळ्याशी संबंधित तपासासाठी दिल्लीहून आलेले ईडीचे पथक ही कारवाई करत आहे. या कारवाईची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर आय-पीएसी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्या आगमनाच्या काही मिनिटे आधीच कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा घटनास्थळी पोहोचले होते.
ईडीच्या छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आय-पीएसी कार्यालयातून काही महत्त्वाच्या फायली आणि लॅपटॉप घेऊन बाहेर पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी अशा प्रकारे राजकीय कार्यालयांवर छापे टाकणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
“येथे पक्षाशी संबंधित अत्यंत गोपनीय कागदपत्रे, निवडणूक रणनीती आणि उमेदवारांच्या याद्या ठेवलेल्या असतात.ed raids त्यामुळे मी पक्षाची महत्त्वाची कागदपत्रे आणि हार्ड डिस्क स्वतःकडे घेत आहे,” असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
भाजपवर निशाणा साधत त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला की, “गृहमंत्री अमित शहा भाजपच्या पक्ष कार्यालयावर ईडीची छापेमारी करण्याचे धाडस करतील का?” तसेच एकीकडे मतदार याद्यांतून नावे वगळली जात असताना, दुसरीकडे संवेदनशील माहिती बेकायदेशीरपणे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कारवाईमुळे बंगालमधील राजकीय वातावरण तापले असून, ईडीच्या छाप्याभोवती मोठा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.