Five important bathing rituals हिंदू धर्मात पवित्र नद्यांमध्ये स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. धर्मग्रंथांनुसार विशिष्ट शुभ तिथींना गंगा, यमुना किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने केवळ पापक्षालन होत नाही, तर जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्ती मिळून मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. सन २०२६ मध्ये असे अनेक दुर्मिळ योग येत असून, या काळात स्नान आणि दान केल्यास त्याचे पुण्यफळ अनेकपटींनी वाढते, असे धार्मिक मानले जाते. या शुभ तिथींना पवित्र नद्यांमध्ये केलेले स्नान शरीरासोबतच मन आणि आत्म्यालाही शुद्ध व प्रसन्न करते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की अशा काळात पाण्यात अमृततत्त्वाचा संचार होतो, ज्यामुळे नकारात्मकता, मानसिक थकवा आणि आळस दूर होतो. स्नानानंतर आपल्या क्षमतेनुसार धान्य, तीळ, वस्त्र किंवा धनाचे दान केल्यास पुण्यसंचय होतो, अशी श्रद्धा आहे.

२०२६ मधील पहिले महत्त्वाचे स्नान मकर संक्रांतीला होणार आहे. १४ जानेवारी रोजी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. या दिवशी प्रयागराज, काशी आणि हरिद्वार येथे गंगा स्नानास विशेष महत्त्व दिले जाते. तीळ दान आणि पवित्र स्नान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
यानंतर १८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येचा योग येत आहे. माघ महिन्यातील ही अमावस्या धार्मिक दृष्टिकोनातून वर्षातील अत्यंत पवित्र दिवस मानली जाते. या दिवशी पवित्र नद्यांचे पाणी अमृतासमान होते, अशी धारणा आहे. मौन पाळून स्नान, जप आणि तपश्चर्या केल्यास पूर्वजांच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती साधते, असे ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतात.
माघ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेचा शुभ दिवस आहे. या दिवशी स्नान केल्यास भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. माघ स्नानाचे व्रत धारण करणाऱ्या भक्तांसाठी हा दिवस व्रतपूर्तीचा मानला जातो. दानधर्म आणि सत्कर्म केल्याने स्वर्गमार्ग सुलभ होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
२५ मे २०२६ रोजी गंगा दशहरा साजरा केला जाणार आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. या दिवशी गंगेत स्नान केल्यास शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशा दहा प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
वर्षातील शेवटचा महत्त्वाचा स्नानयोग २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला येतो. कार्तिक महिना अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याची पौर्णिमा ‘देव दीपावली’ किंवा ‘त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी पवित्र स्नान आणि दीपदान केल्यास जीवनातील अंधकार दूर होतो तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा घरात वास होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
एकूणच, २०२६ मधील या पाच तिथी आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण मानल्या जात आहेत. मोक्षप्राप्ती, मानसिक शांती आणि पुण्यसंचयाची इच्छा असणाऱ्यांसाठी या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व असल्याचे धार्मिक ग्रंथ आणि श्रद्धांमध्ये सांगितले आहे.