नवी दिल्ली,
venezuela buy american goods व्हेनेझुएलामधील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाच्या लोकांनी आता नव्या तेल करारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून केवळ अमेरिकेत तयार होणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करावी, असा आदेश त्यांनी जारी केला आहे. हा निर्णय माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर जाहीर करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, व्हेनेझुएलाच्या नागरिकांना मिळणाऱ्या तेल महसुलाचा वापर अमेरिकन कृषी उत्पादने, औषधे, वैद्यकीय उपकरणे तसेच वीजपुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी लागणाऱ्या अमेरिकन उपकरणांच्या खरेदीसाठीच करावा लागेल. यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील आर्थिक संबंध अधिक घट्ट होतील, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प पुढे म्हणाले की, व्हेनेझुएलाने अमेरिकेलाच आपला प्रमुख व्यापारी भागीदार मानले पाहिजे. हा निर्णय दोन्ही देशांच्या हिताचा असून व्हेनेझुएलासाठी हा सर्वात शहाणपणाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकन उत्पादनांना प्राधान्य दिल्यास व्हेनेझुएलाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर हे सर्व घडामोडी घडल्या आहेत. २ आणि ३ जानेवारीच्या मध्यरात्री अमेरिकेने व्हेनेझुएलावर हवाई आणि स्फोटक कारवाया केल्याची माहिती आहे. पहाटेच्या सुमारास अमेरिकन सैन्याने मादुरो यांच्या निवासस्थानी धडक देत त्यांना ताब्यात घेतले आणि थेट अमेरिकेत नेले. याच कारवाईदरम्यान त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनाही अटक करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या घडामोडींनंतर ट्रम्प प्रशासनाने जागतिक पातळीवर आणखी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. व्हेनेझुएलानंतर भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांवरही आर्थिक दबाव वाढवण्याचे संकेत देण्यात आले असून, तब्बल ५०० टक्के आयात कर लादण्यासंदर्भातील विधेयक मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
याचबरोबर अमेरिकेने ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यामागची कारणे व्हाईट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आली आहेत.venezuela buy american goods “सध्याचा काळ अत्यंत धोकादायक आहे,” असे सांगत ट्रम्प यांनी १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या संरक्षण बजेटचा प्रस्ताव सादर केला आहे. आगामी काळात अमेरिकेच्या लष्करी कारवाया अधिक तीव्र होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
या साऱ्या पार्श्वभूमीवर इराणसह अनेक देशांमध्ये अस्वस्थता पसरली असून, अमेरिकेने व्हेनेझुएलासारखीच कारवाई आपल्यावरही करू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात ट्रम्प आणि पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे खोटे ठरल्याची चर्चा रंगत असून, अमेरिकेसोबत कोणतीही युद्धबंदीची चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.