भरधाव एसयूव्ही झाडावर आदळून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
रंगारेड्डी,
Four students died in the accident तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात भीषण रस्ता अपघाताची घटना समोर आली असून एका भरधाव एसयूव्हीने नियंत्रण सुटून झाडावर जोरदार धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिर्झागुडा परिसरात मोकिला पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शी आणि समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजनुसार, वाहनाचा वेग अत्यंत जास्त होता. झाडावर आदळल्यानंतर कारचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला, त्यामुळे वाहनाची संपूर्ण रचना कोसळली. या भीषण धडकेत कारमधील चारही विद्यार्थी जागीच ठार झाले, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.
 
 
accident rangareddi
 
या अपघातात सूर्यतेजा, सुमित, निखिल आणि रोहित या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सुमित आणि निखिल हे दोघेही २० वर्षांचे होते, तर रोहित हा १८ वर्षीय अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. सूर्यतेजा हा आयबीएस कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत होता आणि तो मंचेरियालचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातावेळी कारमध्ये शुंकारी नक्षत्र ही आयबीएस कॉलेजची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनीही होती. ती या दुर्घटनेत गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली असून, अचानक आलेल्या या दु:खद बातमीने त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. या अपघाताचा पुढील तपास मोकिला पोलिसांकडून सुरू आहे.