गडचिरोली,
Gadchiroli city development, गडचिरोली शहरातील जनतेने मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गोरगरिबांच्या सेवेसाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी दिली. भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आणि नगराध्यक्ष या नात्याने सर्वांसाठी एकदिलाने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर आज, 8 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता गडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात अॅड. प्रणोती निंबोरकर यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, महाराष्ट्रीयन फेटे परिधान करून नगरसेवकांसह त्यांचे आगमन झाले. यावेळी औक्षण करून त्यांना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आसनस्थ करण्यात आले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी पिदूरकर यांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करत नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे अधिकृत स्वागत केले. या पदग्रहण सोहळ्यास गडचिरोलीचे प्रभारी आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, महामंत्री गोविंद सारडा, अरुण निंबोरकर, युवा नेते सागर निंबोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित नगरसेवकांनी अॅड. प्रणोती निंबोरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. विशेष म्हणजे या सोहळ्यास भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवकही उपस्थित होते.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात गडचिरोली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.