पुणे,
Gaja Marne is not entry into Pune पुणे शहरात कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे यांच्यावरील प्रवेशबंदी कायम ठेवण्यात आली आहे. पत्नीच्या निवडणूक प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गजा मारणे यांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत पुण्यातील प्रवेशबंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी बावधन प्रभाग क्रमांक १० मधून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने प्रचारासाठी शहरात येण्याची परवानगी मिळावी, असा दावा गजा मारणे यांनी न्यायालयात केला होता. मात्र त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करता शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते, या कारणास्तव विशेष न्यायालयाने ही विनंती नामंजूर केली. त्यामुळे आगामी निवडणूक काळातही गजा मारणे यांना पुणे शहरात प्रवेश करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. एकीकडे जयश्री मारणे यांची उमेदवारी आणि दुसरीकडे गजा मारणे यांच्यावरील प्रवेशबंदी यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.