तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
godavari-urban : गोदावरी अर्बनने आपल्या कार्यक्षेत्रातील पाचही राज्यात लघू व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘बेस्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी’ म्हणून ‘बँकिंग एक्सलन्स अवॉर्ड 2025’ या प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
चेंबर ऑफ इंडियन मायक्रो, स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्रायझेसच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व विकास आयुक्त डॉ. राजनेश, तसेच सीआयएमएसएमइचे अध्यक्ष सनदी लेखापाल मुकेश मोहन गुप्ता यांच्या हस्ते गोदावरी अर्बनचे उपसरव्यवस्थापक रवी इंगळे व वरिष्ठ व्यवस्थापक महेश केंद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लघू व मध्यम उद्योजकांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी गोदावरी अर्बनने दिलेले भक्कम कर्जपुरवठा, सुलभ बँकिंग सेवा, पारदर्शक व्यवहार व विश्वासार्ह व्यवस्थापन यामुळे संस्थेचे कार्य राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय ठरले आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या उभारणीस व विस्तारास दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेतच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या यशाबद्दल गोदावरी अर्बनचे संस्थापक हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकरसह समस्त संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद व ठेवीदारांचे अभिनंदन केले.
गोदावरी अर्बनने सहकार क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे संस्थेची राष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह ओळख निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.