गोंदिया शहरात बिबट्याची गस्त?

- वन विभाग म्हणतो, एआय एडिट चित्र!

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
गोंदिया, 
gondia-leopard : शहराच्या टोकावर असलेल्या व जंगलाशेजारी असलेल्या गौमतनगर परिसरात मागील दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. बिबट पाहिल्याचे एकाकडून दुसर्‍याला कळत असून कुणीही बिबट पाहिल्याचा दावा केला नाही. दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. माहितीच्या आधारे वनविभागाने परिसरात तपास केला असता बिबट्याचा वावराच्या कोणत्याही पाऊलखुना दिसल्या नसल्याने कुणीतरी बिबट्याचा वावर एडिट करून व्हायरल केल्याचे असल्याचे सांगण्यात आले. तसेच नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहनही केले.
 
 
 
gondia
 
 
 
मागील वर्षी २०२५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात शहरातील गणेशनगर येथील जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एका अस्वलाने तब्बल तीन तास ठिय्या मांडला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या अस्वलाला वन विभागाने मोठ्या शिताफीने रेस्क्यू केला होता. त्यानंतर गोंदिया शहरातील चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पांगोली नदीमार्गे मध्यरात्रीच्या सुमारास एक वाघ आला होता. त्याला मोठ्या तारेवरच्या कसरतीनंतर वन विभागाने रेस्क्यू करून गोरेवाडा येथे पाठवले होते. त्यातच गेल्या सोमवार आणि मंगळवारी पांगडी जंगल परिसरात ठाण मांडून असलेला एक बिबट आता जवळील शहर परिसरात शिरल्याची चर्चा शहरातील प्रभाग क्रमांक २२ या गौतमनगर परिसरात केली जात आहे.
 
 
त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावारण आहे. याबाबतची तक्रार येथील स्थानिकांनी मंगळवार ७ जानेवारी रोजी वन विभागाला केली. माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या पथकाने परिसरात चौकशी केली. चौकशीत कुणीही व्यक्तीने परस्पर बिबट्याला बघितले नसल्याचे, सर्वांनी एक दुसर्‍याच्या तोंडी ऐकून ही चर्चा ऐकल्याचे निर्दशनास आल्याने, कुणीतरी परिसरात बिबट्याचा वावर हा एआय एडिट करून व्हायरल केल्याचा कयास वनविभागाने केले आहे. तसेच हा परिसर जंगलाला लागून असल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहनही वनविभागाने केले आहे.
 
 
गौतमनगर परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट फिरत असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली. स्थानिक नागरिकांनीही परिसरात बिबट फिरत असल्याचे सांगितले. यासंदर्भात वनविभागाला माहिती दिली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
- विजय रगडे
नगरसेवक, प्रभाग क्र. २२, गौतमनगर
 
 
गौतम नगर परिसरात बिबट असल्याची माहिती मिळाली, वनपथकाने जाऊन पाहणी केली असता परिसरात कुठेही पाऊलखूना आढळल्या नाही, प्राप्त चित्रावरून एआय एडिट चित्र असावा, परिसराला लागूनच जंगल आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, हिंस्र वन्य प्राणी आढळल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.
- दिलीप कौशिक
वनपरिक्षेत्राधिकारी, गोंदिया