तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
arhan-walke : स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन-4’ या कार्यक्रमात यवतमाळचा अरहन सुबोध वाळके याची निवड झाली आहे. त्याने एका एपिसोडमध्ये ‘मन उधान वाèयाचे’ गीत गाऊन परीक्षकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, अरहनचे वय फक्त 10 वर्षे असून एवढ्या कमी वयात त्याने भरारी घेतल्याने त्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
अरहन हा पाचव्या वर्गात शिकत असून अरहनला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली आहे. अरहनचे वडील सुबोध वाळके हे गेल्या 25 वर्षापासून संगीत क्षेत्रात असून त्यांचे यवतमाळ शहरात ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. त्यांनी आतापर्यंत आदिवासी गोंडी, मराठी, बंजारा, अशा विविध भाषेत गाणे तयार केले आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अरहनला संगीत क्षेत्रात आवड निर्माण झाली. हळूहळू त्याने घरीच गाणे गायला सुरुवात केली. अरहनला संगीतात रुची असल्याने संगीताचे धडे गौरव मानकर व अतुल शिरे या संगीत शिक्षकांकडे घेण्यास सुरुवात केली. गाणे गाऊन त्याने समाज माध्यमावर प्रसारित करण्यास सुरुवात केली. अनेकांनी अरहनला पसंती दर्शवली. याच माध्यमातून स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमात तब्बल 3500 स्पर्धकांमधून अरहनची निवड झाली व टॉप 12 मध्ये त्याची निवड झाली.
नुकतेच ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला, यात अरहनने ‘मन उधान वाèयाचे’ गीत सादर केले. कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर, गायक आदर्श शिंदे व गायिका वैशाली सावंत यांनी अरहनला दाद दिली. अरहन हा संगीत क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे सांगतो आहे. त्याने गायलेल्या गाण्यांवर समाज माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.