कारंजा लाड,
Inani College scholarship स्थानिक क. रा. इन्नाणी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी यंदाच्या राष्ट्रीय पदव्युत्तर शिक्षण शिष्यवृत्तीसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्रिशला शरद सोनोने (एम.ए. भाग दोन, राज्यशास्त्र) आणि लक्ष्मी नारायण दोडके (एम.एस्सी भाग दोन, प्राणीशास्त्र) या दोन्ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्तरावर या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार द्वारा पुरस्कृत ही शिष्यवृत्ती विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ पदव्युत्तर शिक्षण मिळावे, उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे, तसेच विविध पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने दिली जाते. शिष्यवृत्तीची निवड दरवर्षी संपूर्ण भारतातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांमधून केली जाते. यामध्ये दोन वर्षांसाठी अनुक्रमे दीड— दीड लाख रुपये, एकूण तीन लाख रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. सदर विद्यार्थिनी अत्यंत अभ्यासू, जिज्ञासू व मेहनती आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील, प्रा. डॉ. विजय ढेंगळे, डॉ. कावरे, विनोद विसाले, डॉ. राजगुरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थिनिंचे मनःपूर्वक कौतुक केले आणि त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे क. रा. इन्नाणी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, व शैक्षणिक प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे. या विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन देणारी ही घटना इतरांसाठी प्रेरणेचा स्रोत बनली आहे.