मुंबई,
Indian stock market declines भारतीय शेअर बाजारात गुरुवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट फटका भारतीय बाजाराला बसला आहे. ट्रम्प यांनी भारतावर कठोर टॅरिफ लावण्याचे संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आणि शेअर बाजारात जोरदार विक्री दिसून आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. यानंतर अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला.
भारत-अमेरिका संबंधांबाबत सकारात्मक वक्तव्य करत असतानाच, अचानक ट्रम्प यांनी आणखी धक्कादायक इशारा दिला. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, तर थेट 500 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे भारतासह जागतिक बाजारात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरणीचा साक्षीदार ठरला. विशेषतः तेल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. सकाळच्या सत्रातच सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी घसरून उघडला आणि दिवसभर विक्रीचा दबाव कायम राहिला. दुपारी साडे दोनच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 600 अंकांनी कोसळून 84,360 च्या आसपास व्यवहार करत होता. एकूण बाजार भांडवलात मोठी घट झाली असून गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
भारत हा रशियाच्या तेलाचा मोठा खरेदीदार असल्याने अमेरिकेतील नव्या धोरणांचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता अधिक आहे. अमेरिकेत ‘सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025’ नावाचे विधेयक मांडण्यात आले असून, रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर टॅरिफ लावण्याची तरतूद त्यात आहे. भारतासोबतच चीन आणि ब्राझीलसारख्या देशांचाही यात समावेश आहे. ट्रम्प यांची ही रणनीती रशियावर दबाव वाढवण्यासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे पडसाद थेट भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर उमटताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, येत्या काळात जागतिक राजकीय निर्णयांवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.