कारंजा लाड,
Karanja burglary शहरातील राजदीप नगर परिसरात कुलूपबंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ७ जानेवारी रोजी उघडकीस आली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राध्यापक आत्माराम परशराम राठोड ( वय ६३) हे ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घर कुलूपबंद करून मुर्तीजापूर तालुयातील काजळेश्वर येथे गेले होते. त्याच रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट फोडले आणि त्यातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. ७ जानेवारी रोजी शेजारी सोपान दोरख यांनी घरफोडीची माहिती दिल्यानंतर राठोड यांनी तातडीने घरी येऊन पाहणी केली असता अंगठी, टॉप्स, चेन, मंगळसूत्र, साखळी तसेच चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७२ हजार १९२ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप पवार करत आहेत.