मुंबई
Masti 4 controversy रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय अभिनीत ‘मस्ती ४’ हा एडल्ट कॉमेडी चित्रपट आता त्याच्या ओटीटी रिलीजपूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना उलटल्यानंतर या चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आरजे आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष शर्मा यांनी चित्रपटातील एका दृश्याबाबत निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
लाइव्ह लॉच्या माहितीनुसार, आशिष शर्मा यांचा दावा आहे की जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी तयार केलेली आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक रील चित्रपटात त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आली आहे. ‘शक करने का नतीजा’ या नावाने ओळखली जाणारी ही रील कोणताही श्रेय न देता ‘मस्ती ४’मध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच आरजे तृप्ती यांची रीलदेखील परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले आहे.
या प्रकरणात Masti 4 controversy इन्फ्लुएन्सरने आपल्या सर्जनशील मालमत्तेचा गैरवापर झाल्याचा दावा करत चित्रपटाच्या निर्मात्यांकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच चित्रपटाने कमावलेल्या संपूर्ण नफ्याचा तपशील सादर करण्याचीही मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून व्यावसायिक लाभासाठी त्यांच्या कामाचा वापर करण्यात आला आहे.
या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली असून त्वरित उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२६ रोजी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘मस्ती ४’ हा चित्रपट Masti 4 controversy बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यश मिळवू शकला नाही. मिलाप झवेरी दिग्दर्शित हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता, मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि कमाई या दोन्ही आघाड्यांवर तो अपयशी ठरला. २००४ मध्ये सुरू झालेल्या ‘मस्ती’ फ्रँचायझीचा हा चौथा भाग असून, याआधी ‘मस्ती’, ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. एडल्ट कॉमेडी हा या फ्रँचायझीचा केंद्रबिंदू राहिला असून, चारही चित्रपटांमध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.आता ओटीटी रिलीजच्या तयारीत असलेल्या ‘मस्ती ४’समोर उभ्या राहिलेल्या या कायदेशीर अडचणींमुळे चित्रपटाच्या पुढील वाटचालीवर काय परिणाम होणार, याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.