नाशिक,
Nashik municipal elections महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून नाशिकमध्ये सध्या जोरदार रॅल्या, सभा आणि भेटीगाठींचा धडाका सुरू आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळावर रिंगणात उतरला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत ३९ उमेदवार मैदानात उतरवले आहेत. मात्र, निवडणूक प्रचाराच्या ऐन काळात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन दिग्गज नेते आणि बुलंद प्रचारक मंत्री छगन भुजबळ तसेच माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात सहभागी होता आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या खांद्यावर आली आहे. ते शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी देत उमेदवारांसाठी मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
दुसरीकडे, शिवसेनेने नाशिकमध्ये प्रचाराची आघाडी घेतली आहे. बुधवारी (ता. ७) खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः नाशिकमध्ये येऊन जोरदार प्रचार केला. त्यांच्या उपस्थितीत शहरातून मोठी रॅली काढण्यात आली, ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत.भाजपनेही निवडणुकीसाठी कंबर कसली असून पक्षाचे निवडणूक प्रभारी गिरीश महाजन हे नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत. भाजपकडून बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि उमेदवारांसाठी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. शहरातील विविध भागांत भाजपचे नेते आणि आमदार प्रचार फेऱ्या मारत असून मतदारांपर्यंत विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे.एकूणच, महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असून पुढील सहा दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.