बुलढाणा,
national-kabaddi-tournament : उत्तराखंड येथील नैनिताल येथे १० जानेवारीपासून सुरु होणार्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ कबड्डी संघाच्या कर्णधारपदी येथील कबड्डीपटू तिलक तोंडीलायता यांची निवड झाली आहे. मलेशिया येथे होणार्या एशियन सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेचा संघ देखील या स्पर्धेतून निवडल्या जाणार आहे.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्यावतीने येत्या १० जानेवारीपासून उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे १९ व्या राष्ट्रीय सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विदर्भ कबड्डी संघाचे कर्णधारपदी येथील प्रसिद्ध कबड्डीपटू तिलक तोंडीलायता यांची निवड करण्यात आली आहे. एकूण २८ राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे सदर स्पर्धेमधूनच मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय एशियन सर्कल स्टाईल कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ निश्चित केल्या जाणार आहे.
तिलक तोंडीलायता यांनी याआधीही ४८ व्या ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तसेच १२ व्या समुद्रतट कबड्डी स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर विदर्भाचे प्रतिनिधित्व केले आहे. नैनिताल येथे होणार्या स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड झाल्याचे श्रेय तोंडीलायता यांनी आईवडील, कबड्डी प्रशिक्षक सतीश डाफळे, भारतीय कबड्डी महासंघाचे सचिव जितेंद्र ठाकूर यांना दिले आहे.