वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पोलिस दल सक्षम : अशोक थोरात

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
ashok-thorat : चित्रपटांमधून अनेकदा पोलिसांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जाते. त्यामुळे समाजात पोलिसांविषयी भीती व गैरसमज निर्माण होतात. प्रत्यक्षात समाजातील वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी पोलिस दल सदैव सक्षम असून पोलिस हे समाजाचे खरे रक्षक आहेत, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात यांनी केले.
 
 
 
y8Jan-Thorat
 
 
 
यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे आर्णी तालुक्यातील बोरगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात दोन दिवस विविध प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या दुसèया दिवशी झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
 
 
अशोक थोरात पुढे म्हणाले, मुलगी शिकली तर संपूर्ण समाजाचा उद्धार आणि प्रगती होते. ज्या क्षणी मुलीचे शिक्षण थांबते, त्या क्षणी समाज अधोगतीकडे जाण्यास सुरुवात होते. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असून ही बाब समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
कार्यक्रमात दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांनी विद्यार्थ्यांना कायदे, सायबर गुन्हे, वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा वाहतूक शाखेचे ज्ञानोबा देवकते यांनी रस्ते सुरक्षा व वाहतूक नियमांचे महत्त्व स्पष्ट केले. दामिनी पथकाच्या दीपमाला भेंडे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली.
 
 
यावेळी आर्णीचे पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी गुल्हाने, कराटे प्रशिक्षक डॉ. आनंद भुसारी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश धुमाळ यांनी केले. तर आभारप्रदर्शन अरविंद डंभारे यांनी केले.