नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांचा 100 दिवसांचा शहर विकास कृती आराखडा

यवतमाळला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
priyadarshini-uike : नगर परिषद निवडणुकीत यवतमाळ शहराला एक तरुण, तडफदार व उच्चविद्याविभूषित अ‍ॅड. प्रियदर्शनी अशोक उईके या थेट जनतेमधून विजयी झालेल्या अध्यक्ष लाभल्या आहेत. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच शहराच्या थांबलेल्या विकासाला गती मिळणार हे निश्चित झाले आहे. अ‍ॅड. उईके यांनी शहर विकासाचा 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर केला आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील शहर साकारण्याची भूमिका मांडली आहे. यवतमाळ शहराचा साहित्य, संस्कृती, शिक्षण व क्रीडा यात नावलौकिक आहे. या शहराला ऐतिहासिक पृष्ठभूमी लाभलेली आहे. या कृती आराखड्यात त्यांनी उच्चभ्रू वस्त्यांपासून सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंतचा विचार केला आहे.
 
 
y8Jan-Priyadarshani-Uike
 
यवतमाळ नपचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, सामान्य माणसालाही कर भरणे सोपे व्हावे यासाठी क्यूआर कोड तयार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. विशेष मोहीम राबवून सामान्य माणसापर्यंत माहिती पोहोचवणे, केंद्राच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळतील याची व्यवस्था, विकासात्मक कामाकरिता शासनाकडे निधीची मागणी करणे कृती आराखड्यात अंतर्भूत आहे.
 
 
 
युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वरोजगारक्षम करणे, विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाèया विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत योग्य मार्गदर्शक देण्याचाही त्यांचा मानस आहे. शहर स्वच्छ सुंदर बनविण्याकरता विशेष मोहीम राबवणे. नपमधील जुने अभिलेख असलेले, मुदतबाह्य ठेवे, जुन्या व निरुपयोगी जड वस्तूंची विल्हेवाट लावल्या जाणार आहे. नागरिकांसाठी नपमध्ये मदत कक्ष निर्माण करणे, त्यांना विषयानुसार विभागाची माहिती देणे, हेही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी स्पष्ट केले.
 
 
महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे व हिरकणी कक्ष निर्माण करण्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळेल या दृष्टीने नियोजन सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन करण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या. काळानुरूप नपमधील कर्मचाèयांना नवीन एआय तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य रस्त्यावर लावले जाणार आहेत. आरोग्यासाठी नपचे दवाखाने सुसज्ज करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
 
 
शहरातील रस्त्यांची स्थिती दयनीय असल्याने येत्या काळात उच्च दर्जाचे रस्ते निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. नप अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन केल्या जाईल. एकाच अ‍ॅपमध्ये नागरी सेवा समाविष्ट करण्यात येणार आहेत.
 
 
आरोग्याबाबत कुठलीही हयगय केल्या जाणार नाही. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्ड वाटपासाठी शिबिराचे आयोजन, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवून नागरिकांचे जीवनमान चांगले व्हावे, यासाठी आरोग्य तपासणी करण्यावर भर दिला जाईल.
 
 
शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे हे नप प्रशासनाचे कर्तव्य आहे. पाण्याचा वापर जपून करावा यासाठी जनजागृती केली जाईल, असेही नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके म्हणाल्या.