अमरावती,
solar-project : जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेंदुरजना बाजार येथील ३ मेगावॅट क्षमता असलेला सौर प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ३३ केव्ही तिवसा उपकेंद्राशी जोडलेल्या या प्रकल्पामुळे तिवसा उपकेंद्रावरून वीज पुरवठा होत असलेल्या २ हजार ३६१ शेतकर्यांना दिवसा विजेची सोय झाली आहे. जिल्ह्यात ११ सौर प्रकल्पातून ४९ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होण्यास सुरूवात झाली असून त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल ही स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने झाली आहे.
शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या शासन व महावितरणच्या मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९० उपकेंद्रासाठी ३८९ मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात ११ सौर प्रकल्प सुरू झाले असून ४९ मेगावॅट वीज निर्मितीला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पातून तयार होत असलेल्या विजेमुळे जिल्ह्यातील १८ हजार ३५५ शेतकर्यांना दिवसा वीज मिळायला सुरूवात झाली आहे.
कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या शेंदुरजना बाजार सौर प्रकल्पाची क्षमता ३ मेगावॅट आहे. मे.व्ही.व्ही. के.आर. या विकासकामार्फत एकुण १५ एकर जमिनीवर हे प्रकल्प उभारण्यात आले आहे. या प्रकल्पातून तयार होणारी सौर ऊर्जा ही ३३ केव्ही वीज वाहिनीव्दारे महावितरणच्या ३३ केव्ही तिवसा उपकेंद्राला जोडण्यात आली आहे. त्यामुळे तिवसा उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या ११ केव्ही सातरगाव, ११ केव्ही वरखेड, ११ केव्ही मोझरी आणि ११ केव्ही शेंदुरजना बाजार या कृषी वाहिनीच्या माध्यमातून परिसरातील २ हजार ३६१ शेतकर्यांना दिवसा विजेची सोय झाली आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सौर प्रकल्पाचे काम गतीने सुरू झाले आहे. सौर प्रकल्पाचे काम पूर्ण होताच ते कार्यान्वित करून त्याचा लाभ थेट शेतकर्यांना द्यायला सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील १८ हजारापेक्षा जास्त शेतकर्यांना रात्रीच्या विजेपासून सुटका मिळाली आहे. शिवाय दिवसा आणि शाश्वत विजेची सोय झाल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण आहे.