मुंबईत शिंदे–राऊतांच्या अचानक भेटीने चर्चांना उधाण

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
मुंबई,
Shinde and Raut meet in Mumbai मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक अनपेक्षित घडामोड समोर आली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अचानक एकाच ठिकाणी आमनेसामने आले. एकमेकांवर सातत्याने कठोर टीका करणारे हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
 

raut and shinde meet 
 
महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही नेते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत २०२२ मध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर वारंवार जहरी शब्दांत टीका केली, तर शिंदे गटाकडूनही त्यांना तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर दिलं जात आलं. मात्र, या अचानक झालेल्या भेटीत दोघांमध्ये कोणताही तणाव दिसून आला नाही. उलट, जुनी ओळख आणि मैत्रीची छटा त्यांच्या संवादात जाणवत असल्याचं सांगितलं जात आहे.
ही भेट कोणत्याही पूर्वनियोजनाशिवाय झाली असून, दोघेही एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. समोरासमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांना स्मितहास्य करत विचारपूस केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून हा केवळ औपचारिक आणि सौजन्यपूर्ण संवाद होता. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असताना ही भेट झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर आणि रस्त्यावर तीव्र वाद सुरू असताना, दोन वरिष्ठ नेत्यांमधील हा सौम्य संवाद अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. त्यामुळे ही केवळ योगायोगाची भेट की भविष्यातील राजकीय हालचालींची नांदी, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.