नवी दिल्ली,
Team India faces a major crisis टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या तयारीला वेग आला असतानाच भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी एका स्टार खेळाडूच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यामुळे संघ व्यवस्थापनाची धाकधूक वाढली आहे. भारतीय संघ ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून, त्यानंतर २१ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे. ही टी-२० मालिका ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातीलच खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मात्र, या तयारीदरम्यान युवा स्टार फलंदाज तिलक वर्माच्या दुखापतीने संघाच्या चिंतेत भर घातली आहे. अभिषेक शर्मासोबतच २०२५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सातत्याने प्रभावी ठरलेला तिलक वर्मा सध्या पोटाच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे वृत्त आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याचा उत्तम फॉर्म दिसून आला होता, त्यामुळे त्याची अनुपस्थिती संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, तिलक वर्माला या दुखापतीवर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला असून, त्यातून पूर्णपणे सावरण्यास तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत तो २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत त्याचा सहभाग संशयात आहे.
राजकोट येथे सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान तिलक वर्माला या दुखापतीची जाणीव झाली. त्यानंतर त्याने बेंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली. स्कॅन आणि वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची शिफारस केल्याचे समजते. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी तिलकच्या जागी तत्काळ बदली खेळाडू जाहीर होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी म्हणजे श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मॅच-फिट ठरवले आहे. त्याआधी अय्यर मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफीच्या शेवटच्या लीग सामन्यात खेळणार असून, त्यानंतर तो थेट भारतीय संघात दाखल होणार आहे.