दिल्ली वार्तापत्र
tradition of unopposed elections महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत 68 नगरसेवक अविरोध निवडून आल्यामुळे वादळ उठले आहे, अविरोध निवडून आलेले जवळपास सर्वच सदस्य भाजप आणि शिंदेसेनेचे असल्यामुळे निवडीच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, त्यांना आरोपीच्या पिंजèयात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मुद्यावरुन राजकीय वातावरणही तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यावेळी प्रथमच एखाद्या निवडणुकीत उमेदवार अविरोध निवडून आले का, याआधी असे कधी झाले नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. विधानसभा आणि लोकसभेपासून देशात आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीत काही उमेदवार अविरोध विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे फक्त भाजपाचेच उमेदवार अविरोध विजयी झाले, अन्य पक्षांचे नाही, असेही कधी झाले नाही. अनेक निवडणुकांत काँग्रेस, सपा, नॅशनल कॉन्फरन्स यांचेही उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह डॉ. फारुक अब्दुल्ला आदी नेते लोकसभेवर अविरोध निवडून आले आहेत. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या बहुतांश निवडणुका तर अविरोधच होत असतात, मग यावेळीच अविरोध निवडणुकीवरुन गदारोळ का केला जात आहे?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल अविरोध विजयी झाले होते. यावेळी काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज निवडणूक अधिकाèयांनी फेटाळून लावला, गंमत म्हणजे काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही फेटाळल्या कगेला. त्यानंतर रिंगणातील अन्य 8 उमेदवारांनी माघार घेतली. त्यावेळीही दलाल यांच्या अविरोध निवडीवर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्याआधी 2012 मध्ये उत्तरप्रदेशच्या कन्नौज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या डिम्पल यादव अविरोध निवडून आल्या होत्या. खासदार असलेल्या अखिलेश यादव यांची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कन्नौजच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि ते विधानपरिषदेत गेले. सपाने या मतदारसंघात डिम्पल यादव यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि बसपाने या मतदारसंघात उमेदवारी अर्जच भरला नाही, भाजपाचा उमेदवारही अर्ज दाखल करु शकला नाही. अन्य दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे डिम्पल यादव यांची अविरोध निवडून आल्या.
मुळात एखादा उमेदवार अविरोध तेव्हाच निवडून येतो, जेव्हा त्यांच्याविरुध्द रिंगणात एकही उमेदवार नसतो. अनेक वेळेला काही उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणाने म्हणजे पुरेशी कागदपत्रे न जोडल्यामुळे रद्द होतात, तर काही वेळेला उमेदवार स्वत:च निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात. त्यामुळे रिंगणात असलेल्या एकमेव उमेदवाराला अविरोध विजयी घोषित केले जाते.
देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 ला झाली, यात दहा उमेदवार अविरोध निवडून आले होते. त्यावेळी जनसंघाची नुकतीच स्थापना झाली होती, त्यामुळे भाजपाचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे त्यावेळी निवडून आलेले सर्वच उमेदवार काँग्रेसचे होते. 1957 च्या दुसèया सार्वत्रिक निवडणुकीत 11 उमेदवार अविरोध विजयी झाले. 1962 च्या निवडणुकीत तीन तर 1967 च्या निवडणुकीत पाच उमेदवार अविरोध निवडून आले. 1971 च्या एक तर 1977 च्या लोकसभा निवडणुकीत दोन उमेदवार अविरोध विजयी घोषित करण्यात आले. 1984 च्या लोकसभा निवडणुकीतही एकमेव उमेदवार अविरोध निवडून आला होता.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण नाशिक लोकसभा मतदारसंघात 1963 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अविरोध विजयी झाले होते.चीनच्या आक्रमणानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत बोलावले आणि त्यांना संरक्षणमंत्री केले.tradition of unopposed elections महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, असे या घटनेचे वर्णन तेव्हा करण्यात आले होते. चीनसोबतचे युध्द संपल्यानंतर चव्हाण यांना लोकसभेत निवडून आणण्याचे ठरले. नाशिक लोकसभा ममतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत चव्हाणांबद्दलचा आदर आणि कृतज्ञता म्हणून त्यांच्याविरुध्द उमेदवार उभा न करण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी घेतला. परिणामी चव्हाण अविरोध विजयी झाले. माजी अर्थमंत्री टी.टी. कृष्णमाचारी 1962 च्या लोकसभा निवडणुकीत तामीळनाडूच्या तिरुचेंदूर मतदारसंघातून विजयी झाले होते. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, ओडिशाचे तत्कालिन मुख्यमंत्री हरेकृष्ण मेहताब, लक्षद्वीपचे पी.एम. सईद तसेच नागालॅण्डचे माजी मुख्यमंत्री एस.सी. जमीर सुध्दा अविरोध निवडून आले होते. देशाच्या पहिल्या निवडणुकीपासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तीन डझनावर अविरोध विजयी झाले आहेत.
नीलम संजीव रेड्डी हे देशातील पहिले आणि एकमेव राष्ट्रपती होते. जे अविरोध निवडून आले होते. जनता पक्षाच्या कार्यकाळात रेड्डी राष्ट्रपतिपदी विजयी झाले, 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 असा त्यांचा त्यांचा राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ होता. काँग्रेससह अन्य सर्व विरोधी पक्षांनी रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.
देशात उपराष्ट्रपतिपदासाठी 16 वेळा निवडणूक झाली, पण त्यातील फक्त चार निवडणुका अविरोध झाल्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन दोन्ही वेळेला उपराष्ट्रपतिपदी अविरोध निवडून आले, पहिल्यांदा 1952 ला आणि नंतर 1957 ला. मोहम्मद हिदायतुल्ला 1979 मध्ये उपराष्ट्रपतिपदी अविरोध निवडून आले. त्यानंतर असे भाग्य डॉ. शंकरदयाल शर्मा यांना 1987 मध्ये लाभले.
ऑगस्ट 2024 मध्ये राज्यसभेच्या 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व म्हणजे 12 उमेदवार अविरोध विजयी झाले. यात भाजपाच्या 9, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक मोर्चाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश होता. त्याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यसभेच्या 41 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, काँग्रेसच्या सोनिया गांधी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अविरोध निवडून आले होते.
सामान्यपणे निवडणूक जितकी वरच्या पदाची असेल त्यात अविरोध निवडीची शक्यता जास्त असते. खालच्या पदावरील निवडणुकीत दावेदार खूप असल्यामुळे चुरस असते. 2024 मध्ये पंजाबमध्ये सरपंचाच्या 13 हजार पदांसाठी निवडणूक झाली, त्यातील 3 हजार सरपंच अविरोध निवडून आले. एवढ्या मोठ्या संख्येत सरपंच अविरोध निवडून आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा आश्चर्य व्यक्त केले, तसेच असंतुष्ट उमेदवारांना निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल करण्याची अनुमती दिली. आयोगाने सहा महिन्यात यावर निर्णय घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. या याचिकांचे पुढे काय झाले, ते मात्र समजू शकले नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातील महानगर पालिका निवडणुकीत अविरोध विजयी झालेल्यांवरुन वाद निर्माण करणे योग्य नाही. अविरोध निवडीचा फायदा कमीजास्त प्रमाणात देशातील सर्वच राजकीय पक्षांना वेळोवेळी मिळाला आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. धनाचे आमिष दाखवून वा धमक्या देऊन कोणाला निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास भाग पाडले जाऊ नये, तो स्वेच्छेने माघार घेत असेल त्यात गैर आणि बेकायदेशीर काही नाही.
श्यामकांत जहागीरदार
9881717817
........................................................