१७ वर्षीय महिला नेमबाजाच्या शोषणप्रकरणी क्रीडा जगत हादरले; राष्ट्रीय पिस्तूल प्रशिक्षक अंकुश भारद्वाज निलंबित

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ankush bhardwaj भारतीय क्रीडा क्षेत्राला लज्जास्पद ठरवणारी एक गंभीर घटना समोर आली असून, राष्ट्रीय पातळीवरील पिस्तूल प्रशिक्षक अंकुश भारद्वाज यांच्यावर १७ वर्षीय महिला नेमबाजाचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) ने तातडीने त्यांना निलंबित केले आहे.
 
 

ankush bhardwaj 
 
 
ही घटना ६ जानेवारी २०२५ रोजी घडल्याचा दावा पीडित खेळाडूच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार, नवी दिल्लीतील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेदरम्यान प्रशिक्षकाने खेळासंदर्भातील चर्चेचे कारण पुढे करत अल्पवयीन खेळाडूला फरीदाबादमधील एका हॉटेलमध्ये बोलावले. सुरुवातीला हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटण्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर तिला जबरदस्तीने खोलीत नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास तिचे क्रीडा करिअर संपवण्याची तसेच कुटुंबाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी प्रशिक्षकाने दिली. भीती आणि मानसिक धक्क्यातून सावरत खेळाडूने कसेबसे हॉटेल सोडले आणि नंतर संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबाने थेट पोलिसांकडे धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव पवन कुमार सिंग यांनी स्पष्ट केले की, चौकशी पूर्ण होईपर्यंत अंकुश भारद्वाज यांना कोणतीही जबाबदारी दिली जाणार नाही.ankush bhardwaj संघटनेने शून्य सहनशीलतेची भूमिका घेत तात्काळ निलंबनाची कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, फरीदाबादच्या एनआयटी महिला पोलिस ठाण्यात प्रशिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम ६ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, क्रीडा क्षेत्रात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.