तुर्कमान गेट हिंसाचारात ३० जणांची ओळख पटली, ४०० व्हिडिओंचा तपास

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Turkman Gate violence दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली असून आतापर्यंत ३० जणांची ओळख पटवण्यात आली आहे. फैज-ए-इलाही मशिदीजवळील बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची कारवाई सुरू असताना मंगळवारी रात्री अचानक हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख निश्चित केली आहे. पोलिसांकडे सध्या ४०० हून अधिक व्हिडिओ उपलब्ध असून त्यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके छापे टाकत आहेत.
 

Turkman Gate violence 
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शाहनवाज, मोहम्मद अरिब, मोहम्मद काशिफ, मोहम्मद अदनान आणि मोहम्मद कैफ यांचा समावेश आहे. त्यांना ड्युटी मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने आज तीस हजारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला जाणार आहे. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले आहे की या हिंसाचारात स्थानिक रहिवाशांसह बाहेरून आलेले काही लोकही सहभागी होते. याशिवाय, दगडफेक भडकवण्यात काही राजकीय व्यक्तींची भूमिका असण्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. दोन ते तीन व्यक्तींची ओळख पटली असली तरी तपास सुरू असल्याने त्यांची नावे सध्या जाहीर करण्यात आलेली नाहीत.
 
 
दरम्यान, समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्लाह नदवी यांच्या उपस्थितीबाबतही पोलिस चौकशी करत आहेत. दगडफेक सुरू होण्यापूर्वी ते मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र, खासदार नदवी यांनी आपण स्थानिक नागरिकांच्या विनंतीवरून तिथे गेलो होतो आणि हिंसाचाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी तपास पूर्ण झाल्यानंतर या घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला असून तुर्कमान गेट परिसरातील परिस्थितीवर सध्या कडक नजर ठेवण्यात येत आहे.