नागपूर,
vanamati-children-drama वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे मागील चार दिवस सुरू असलेल्या २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा गुरुवार दिनांक ८ जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण २४ बालनाट्यांचे सादरीकरण झाले. नाटकांच्या माध्यमातून संस्कार, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक भान यांचा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी “संस्कारक्षम व्यक्ती होण्याचा” संकल्प केला.
(गुलमोहर नाटकातील एक प्रसंग)
vanamati-children-drama यावेळी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी तंत्रज्ञानाच्या अतिरेकावर भाष्य करणारे ‘खादाड’ या बालनाट्यातून संवादाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘जीर्णोद्धार’ने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. ‘भल्लातक’ या नाटकातून बालगुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेवर उपाय म्हणून संस्कार व शिक्षण हाच पर्याय असल्याचा ठोस संदेश दिला. ‘गुलमोहर’ या हृदयस्पर्शी नाटकात शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष भावनिक पातळीवर मांडण्यात आला, तर ‘साखळदंड’मधून शिक्षणामुळे जीवनातील बंधने कशी तुटू शकतात, हे प्रभावीपणे साकारले.
vanamati-children-drama स्पर्धा संपू नये, अशी भावना लहानग्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. बालकलावंतांचा उत्साह, शिकण्याची जिद्द आणि कल्पकता प्रत्येक नाटकातून ठळकपणे जाणवत होती. आयोजकांनी उभारलेल्या सेल्फी पॉईंट्सवर मुले आनंदाने क्षण टिपत होती. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली. ही स्पर्धा केवळ स्पर्धा न राहता मुलांसाठी शिकण्याचे आणि व्यक्तिमत्व घडवण्याचे माध्यम ठरली. स्पर्धेच्या चारही दिवशी मोठ्या संख्येत रसिकांची व पालकांची उपस्थिती होती.