देवळी,
rajesh-bakane : व्हीबी-जी राम-जी विधेयकाची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध संमेलन, बैठका व जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या अनुषंगाने प्रदेश भाजपकडून विशेष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून खा. डॉ. अनिल बोंडे यांची संयोजक, मकरंद कोरडे, आ. सत्यजित देशमुख व आ. राजेश बकाने यांची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली व्हीबी-जी राम जी विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण विधेयक लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. विकसित भारताच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारे हे क्रांतिकारी विधेयक असून, ग्रामीण भागातील रोजगार, उपजीविका आणि पायाभूत सुविधा यांना अभूतपूर्व चालना देणारे असल्याचे मत आ. राजेश बकाणे यांनी व्यत केले.
या विधेयकामुळे ग्रामीण भागातील कामगारांना मिळणार्या रोजगाराच्या दिवसांमध्ये १०० दिवसांवरून थेट १२५ दिवसांपर्यंत वाढ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यास मोठा हातभार लागून कामांमध्ये पारदर्शकता वाढून भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे. शेतीपूरक व्यवसाय, ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला.
ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊल आगामी काळात गावांचा कायापालट घडवेल, असा विश्वास आ. बकाने यांनी व्यत केला.