वर्धा,
self-immolation : आर्वी तालुक्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयात पर्यवेक्षक पदावर बढती मिळालेल्या रत्नमाला मेंढे यांना वर्ष लोटूनही मान्यता देण्यात आली नाही. त्यातच त्यांचे वेतनही देण्यात आलेले नाही. त्यांच्या पदाला मान्यता देऊन एक वर्षाचे वेतन द्यावे, या मागणीसाठी विविध शिक्षक आणि सामाजिक संघटनांनी गुरुवार ८ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास २६ रोजी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वावलंबी विद्यालयात कार्यरत रत्नमाला मेंढा यांना खरांगणा शाळेत पर्यवेक्षक पदावर बढती देण्यात आली. मात्र, त्यांच्या पदोन्नती मान्य करण्यात आलेली नसून वर्षभरापासून वेतनही देण्यात आलेले नाही. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्यानंतर ८ जुलै २०२५ रोजी सुनावणी घेण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धरमपाल मेश्राम यांच्या दालनात ७ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. शिक्षण अधिकारी जयश्री घारफळकर, संस्था सचिव अभय केवलिया आणि सहाय्यक संचालक दीपेंद्र लोखंडे उपस्थित होते. त्यांनी पर्यवेक्षक रत्नमाला मेंढे यांच्या बाजूने निकाल दिला. उपशिक्षण संचालक आणि आयोगाच्या निर्णयानंतर पर्यवेक्षक रत्नमाला मेंढे यांना न्याय मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.
दरम्यान, पर्यवेक्षक रत्नमाला मेंढे यांना न्याय मिळावा यासाठी ८ जानेवारीपासून विविध संघटनांच्या पदाधिकार्यांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास २६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी विकास परिषदेचे चंद्रशेखर मडावी, प्रजासत्तक शिक्षक संघटनेचे अरुण कुमार हर्षबोधी, समाजसेवा संघटनेचे नंदकुमार कांबळे, बुद्ध टेकडी परिवारचे प्रकाश कांबळे यांनी दिला आहे.