‘त्या’ वाघाच्या मृत्यूचे गुढ कायमच!

    दिनांक :08-Jan-2026
Total Views |
वर्धा, 
tigers-death : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना ३१ डिसेंबर २०२५ रोजी हिंगणघाट तालुयातील सेलू मुरपाड परिसरातील कॅनलमध्ये वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मृत वाघाच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वनविभागाला प्राप्तही झाला. पण, या घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटूनही वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला, कॅनलमध्ये कुणी फेकले याचा उलगडा करण्यात वनविभागाला अद्यापही यश आले नाही.
 
 
tiger
 
कॅनलमध्ये मृत वाघ असल्याचे लक्षात आल्यावर घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून मृत वाघाला पाण्याबाहेर काढून पाहणी केली. पंचनामा आणि उत्तरिय तपासणीअंती वाघाच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. घटना उघडकीस आल्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी चार चमू तयार करून परिसर पिंजून काढला. पण, दोन किमीच्या परिघात वाघाचे पगमार्कही आढळले नाही. त्यामुळे शेताला लावलेल्या वीज प्रवाहित तारेच्या कुंपनाचा झटका लावून या वाघाचा मृत्यू झाल्यावर घटनेची माहिती कुणाला मिळू नये तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने वाघाचा मृतदेह कॅनलमध्ये फेकण्यात आला असावा, या निष्कर्षावर वनविभागाचे अधिकारी पोहोचले आहे. घटनेच्या अनुषंगाने अधिकची माहिती गोळा करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आठ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न करीत आहे. पण, त्यांना पाहिजे तसे यश आले नसल्याचे दिसून येत आहे.
 
 
संशयितांची झाडाझडती
 
 
शेतातील तारेच्या कुंपनात वीज प्रवाहित करून वाघाला ठार करण्यात आले. नंतर वाघाचा मृतदेह कॅनलमध्ये फेकण्यात आल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून वर्तविला गेला. त्या दिशेने घटनेतील दोषींचा शोधही घेतला जात आहे. त्यासाठी ज्यांच्यावर संशयाची सुई सरकत आहे त्यांना ताब्यात घेत घटनेच्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी संशयितांची झाडाझडती घेत आहेत. बुधवार ७ जानेवारीला काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण, चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने त्यांना सोडण्यात आल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून सांगण्यात आले.