वाशीम,
Washim district Jal Jeevan Mission, ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध व मुबलक पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने जलजीवन मिशनचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला. ‘हर घर नल, हर घर जल’ या घोषवायाने ग्रामीण जनतेमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. मात्र र्वाीन जिल्ह्यात या महत्त्वाकांक्षी योजनेचे वास्तव अत्यंत निराशाजनक ठरत असून, एकही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात शेकडो कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असली तरी निधीअभावी व कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे बहुतेक कामे अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आली आहेत. मागील तीन ते चार वर्षांपासून जलजीवन मिशनची कामे अनेक गावांमध्ये रखडलेली आहेत. या कालावधीत पाईपलाईन टाकण्यासाठी गावोगावी चांगले सिमेंट व डांबरी रस्ते फोडण्यात आले मात्र्र काम अर्धवट राहिल्याने हे रस्ते आजही दुरुस्त न होता तस्सेच पडून आहेत. यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुठे विहीर आहे पण नळजोडणी नाही, तर कुठे नळजोडणी आहे पण पाण्याचा स्त्रोतच उपलब्ध नाही अशी विचित्र व विस्कळीत परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे जलजीवन मिशन नव्हे तर जलमरण मिशन अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांतील अर्धवट पडलेल्या जलजीवन मिशनच्या कामांना तातडीने सुरू करावे, निधी उपलब्ध करून देऊन जबाबदार अधिकार्यावर कारवाई करावी, अशी ठाम मागणी सर्वस्तरातून होत आहे