वेध
anil dautakhani चंद्रपूर जिल्ह्यात किडनी विक्री प्रकरण ताजेच आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण भरती करण्यापूर्वीच अॅडव्हॉन्स पैसे घेणे किंवा रुग्ण दगावल्यानंतर पैसे मिळाल्याशिवाय नातेवाईकांना शव न देणे ही सर्व उदाहरणं वानगीदाखल आहेत. समाजात क्रौर्याची सीमारेषा राहिलेली नाही. पैसा-संपत्तीसाठी नाती तुडवली जातात. आई-वडिलांना घराबाहेर काढणारी बेशरम पिढी आम्हीच डोळ्याने बघतो आहे. एकंदरीत समाज व्यवस्था दिशाहीन झाली आहे. अशा नात्यागोत्याच्या कडक उन्हात जातपात, समाजाची चौकट तोडून थंड हवेची एक झुळूक वर्धेत आली. कदाचित ही समाज व्यवस्था पुन्हा सुदृढ होण्याची नांदीच म्हणावी लागेल. त्यासाठी एकाला प्राणाची बाजी लावावी लागली. एका घटनेने समाज एकसंध होऊन त्याला पाझर फुटणार असेल तर प्राणाची बाजी लावणारा पहिला जिगरबाज ठरेल तो वर्धेतील अनिल दाऊतखानी! त्याच्या एकाच्या जाण्याने अख्खा समाज हळहळला, नव्हे अनेकांचे डोळे डबडबले. कोण असेल बरं हा अनिल दाऊतखानी? मोठा समाजसेवक, दाता, मार्गदर्शक वगैरे... यातील काही नाही. तो फक्त ‘तबला’ बोलका करणारा होता. जुजबी कमाईतून तो आपला संस्कार अगदी आनंदात सांभाळत होता. हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त करून देव त्याला देवाघरी घेऊन गेला.
वर्धेतील अनिल दाऊतखानी यांचा मृत्यू म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जाणे नव्हे, तर अख्ख्या वर्धेच्या मनावर उमटलेला खोल घाव आहे. अनिल गेला? असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. सत्य स्वीकारायला आजही वर्धेचं मन तयार नाही. वर्धेच्या गल्लीबोळांत, कार्यक्रमांच्या पायऱ्यांवर, देवळांच्या प्रांगणात आणि घराघरांत त्यांच्या तबल्याच्या ठेक्यांसोबत जे हास्य गुंजायचं ते अचानक थांबलं आणि त्या शांततेनं शहरातील अनेकांना चटका लावून गेला. त्याला घेऊन जाणारा यमराज आपले कर्तव्य पार पाडून गेला असेल. नियतीच्या वहीत लिहिलेलं पान त्यानं उलटवलं असेल. पण, वर्धेकरांचे अनिलवर असलेलं प्रेम पाहून मृत्यूही ओशाळला असेल! त्याचा प्राण निघाला आणि पुढे काय असा प्रश्न निर्माण आला. परिचितांनी व्हॉट्सअॅपवर फक्त एक पोस्ट टाकली आणि 500 ते 5000 हजार असे मदत करणारे हात पुढे आले. एवढेच नव्हे, तर एका नगरसेवकाने त्या परिवाराला आयुष्यभर अर्धा लिटर दूध देण्याचे सांगितले. गहू, तांदूळ आणि डाळही पोहोचविली. क्रिया कर्म करण्यासाठी पुरोहितांनी एकही रुपयाही न घेण्याचा निर्णय घेतला. इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतकी हळवी आठवण क्वचितच कोणाच्या वाट्याला येते. माणूस जातो तेव्हा त्याच्यासोबत आठवणी उरतात. पण, अनिल गेला तेव्हा आठवणींसोबत हळहळ राहिली. घरची परिस्थिती मोजकीच नव्हे तर तोलाची होती. रोजचा दिवस म्हणजे संघर्ष. पण तो संघर्ष त्याने कधी कोणाला जाणवू दिला नाही. अशा परिस्थितीत अनेक जण तुटून जातात. पण, अनिल तसा नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर कायम शांत हास्य असायचं, डोळ्यांत समाधान आणि मनात आपली कला जपण्याचा अभिमान. तबला त्याचा छंद नव्हता; तोच त्यांचा श्वास होता! तबल्याच्या ठेक्यात त्याची मेहनत होती, घरची जबाबदारी होती, मुलांच्या भविष्याची चिंता होती. वर्धेतील कितीतरी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या तबल्याशिवाय अपुरे वाटायचे. मी कलाकार असा आव आणला नाही. असलेल्या परिस्थितीत कुटुंब कसं सांभाळायचं याचा परिपाठ त्याने घालून दिला. दहावीतील मुलगी आणि त्यापेक्षा छोटा मुलगा येत्या आठवड्यात परिसरातील कार्यक्रमाच्या निमित्ताने हॉटेलमध्ये जेवायला जाणार होते. मुलं पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला जाणार असल्याचा आनंद बापाला झाला होता. त्याच्या कुटुंबासाठी हा आघात असह्य आहे. आधाराचा खांदा अचानक निखळावा, अशी ही वेळ. पण, अनिलने आयुष्यभर कमावलेली माणसांची साथ, प्रेम आणि आदर हेच त्याच्या कुटुंबासाठी खरी संपत्ती ठरली.anil dautakhani हे तो गेल्यानंतर उघड झाले. त्याच्यावर अन्त्यसंस्कार कसे होतील असा प्रश्न असताना वर्धेकरांनी सढळ हातांनी नि:स्वार्थपणे मदत केली आणि मदतीचा ओघ सुरू आहे. जो त्या वेटाळात राहतो त्या भागातील रहिवासांनी मुलांच्या भविष्याची तरतूद करण्याची तयारी सुरू केली. आर्ट ऑफ लिव्हिंगचा तो सदस्य असल्याने या परिवाराने लाखोंत मदत करण्याचा निर्णय घेतला. संस्कार भारतीसह विविध सामाजिक संघटनांशिवाय व्यक्तिगतही मदत करणारे हात पुढे आले. माणूस किती कमावतो यापेक्षा तो किती माणसं जोडतो हे महत्त्वाचं असतं; तो या परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने गरिबीचा कधी बाऊ केला नाही. गावातील राजकारणी किंवा मानवाईक गेल्यावर जशी श्रद्धांजली सभा घेतली जाते तशी श्रद्धांजली सभा झाली. हा सारा गोतावळा आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहून मृत्यूही ओेशाळाला नसेल तर नवलच!
प्रफुल्ल क. व्यास
9881903765