सेलू,
burglary शहरातील देवतारे लेआऊटमध्ये चोरीचे सत्र सुरूच असून आरोपी मात्र अद्यापही मोकाटच असल्याचे चित्र आहे. सदर प्रभागात ही चौथी चोरीची घटना आहे. आधी हातगाडी, नंतर हंडा चोरी, त्यानंतर लोहा आणि आता भरदिवसा चक घरात शिरून कपाटातील रोकड लंपास करण्यात आली. चोरट्यांची हिंमत एवढी वाढली की आता रात्रीची चोरी कशाला? चोरी दिवसाच करून मोकळे व्हावे, असाच काहीसा प्रकार या चोरी प्रकरणातून उघड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी अमर भोसले हे देवतारे ले-आऊट मधील सुनीता माजरे यांच्या घरी किरायाने राहतात. पती अमर दिवसा कंपनीत कामावर जात असून पत्नी येथील मगन संग्रहालयात बचत गटात कामाला जातात. शुक्रवार ९ रोजी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी संधी साधून भोसले यांच्या घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख ४५ हजार रुपये घेऊन पसार झाले. मुलाची शाळा सुटल्यानंतर सृष्टी भोसले दुपारी २ वाजता घरी आल्यावर चोरी झाल्याची शंका आली. कपाट बघितले असता सर्व साहित्य अस्तव्यस्त होते. कपाटात ठेवलेले पैसेही गायब असल्याचे लक्षात आले.burglary याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपास अधिकारी, कर्मचारी आणि फॉरेन्सिक टीम, श्वान पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. चोरीचे वाढते प्रमाण आता नागरिकांच्या भीतीचे कारण बनत आहे. पोलिस विभागाने आता चोरांच्या मुसया आवळणे गरजेचे झाले आहे.