तभा वृत्तसेवा राळेगाव
cloudy weather दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे त्याचा फटका रबी हंगामातील हरभरा, तूर व भाजीपाला पिकांना बसू लागला आहे. या ढगाळ वातावणामुळे पहाटेपासून सकाळी आठपर्यंत धुक्याचे जाळे विणले जात आहे. हे वातावरण रोग व किडींना पोषक ठरत असल्याने शेतकèयांची चिंता वाढली आहे. या नव्या संकटापुढे शेतकरी हतबल झाला आहे.
अगोदरच अवकाळी पावसामुळे खरिपात परवड होऊन वाताहत झालेली असताना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व चालू वर्षात प्रारंभी ढगाळ वातावरणामुळे विविध पिकांवर रोगराईचे संकट पसरले आहे. हरभरा, गहू तसेच भाजीपाला पिकावर मावा, बारीक किडे व अळींचे प्रमाण वाढल्याने औषध फवारण्याचा खर्चही वाढला आहे. त्यासोबत पुन्हा अधूनमधून अवकाळीची संक्रांत मानगुटीवर बसू लागली आहे.
अवेळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप हंगामातील सोयाबीनसारखे नगदी पीक मातीत गेले. उत्पादन झाले नाहीच, उलट पिकासाठी केलेला खर्चदेखील निघाला नाही. त्यामुळे शेतकèयाचे आर्थिक चक्र मोठ्या प्रमाणावर गडगडले. परिणामी, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यातच सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे.
तूर, गहू, हरभरा उत्पादनावर परिणाम
मागील काही मोठ्या प्रमाणात थंडी पडू लागली होती त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. परंतु, चार-पाच दिवसांपासून आभाळ असल्याने थंडी कमी झाली. याचा परिणाम गहू, हरभरा, तूर व भाजीपाला पिकांवर परिणाम होत आहे. शेती करणे सध्या तरी परवडत नाही. त्यात आता निसर्ग साथ देत नसल्याने शेतकèयांनी काय करावे, हेच कळत नाही. महागाई वाढली असून, त्या तुलनेत पिकांना भाव मिळत नाही. आता हवामान बदलाचा फटका पिकांना बसत आहे.
- खुशाल आंबटकर
शेतकरी, राळेगाव