नवी दिल्ली,
Curfew-like situation in the Turkman area. दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात अलीकडे घडलेल्या हिंसक घटनेनंतर आज होणाऱ्या शुक्रवारच्या नमाजीवर अनिश्चिततेचे सावट आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर काही असामाजिक घटकांनी दगडफेक केल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून, सध्या अघोषित संचारबंदीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फैज-ए-इलाही मशिदीत दुपारी २:३० वाजता नमाज अदा केली जाते, मात्र आज नमाज होणार की नाही याचा अंतिम निर्णय पोलिस प्रशासन घेणार आहे.
दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. बुलडोझर कारवाईनंतर परिसरात साचलेला कचरा हटविण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी भीतीचे वातावरण कायम आहे. स्थानिक समितीच्या सदस्यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिस प्रशासनाकडून त्यांच्याशी कोणताही थेट संवाद साधण्यात आलेला नाही. पोलिसांनी परवानगी दिल्यास मशिदीत नमाज अदा केली जाईल, अन्यथा कोणालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाणार नाही. अशा परिस्थितीत इतर प्रमुख मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. समितीच्या सदस्यांनी या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, परिसरातील निमलष्करी दल मागे घेऊन स्थानिक पोलिसांची तैनाती करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पोलिस परिसरातील लोकांना ओळखतात, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास ते अधिक सक्षम ठरतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेची पार्श्वभूमीही समोर आली आहे. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्रीनंतर तुर्कमान गेट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बुधवारी रात्री सुमारे १२:३० वाजता ३२ बुलडोझर, ५० डंपर आणि २०० हून अधिक कामगार घटनास्थळी दाखल झाले. बुलडोझर कारवाई पहाटे १ वाजता सुरू होणार होती, मात्र त्याआधीच मोठ्या संख्येने लोक जमा होऊ लागले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी पहाटे १:१५ वाजता जमावाला हटवण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच, पहाटे १:२३ वाजता दगडफेक सुरू झाली आणि सुमारे दहा मिनिटे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी जमाव आणि दंगलखोरांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे.'