रवींद्र तुरकर
गोंदिया,
challenge of urban development शहराच्या राजकारणाच्या रणांगणातील धुरळा आता शांत झाला आहे. ४५ लोकप्रतिनिधींच्या रूपाने शहराला नव्या कारभार्यांची दमदार फळी मिळाली आहे. मतदारांनी मतपेटीतून या नगरसेवकांना त्यांचा कौल दिला खरा, मात्र आता शहरवासीयांना वेध लागले आहेत ते शहराच्या विकासाचे. जवळपास ४६ महिने येथील नगरपरिषदेवर प्रशासक राज राहिला. प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक पार पडली. आज स्थितीत शहरात विविध नागरी व सार्वजनिक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. मतदारांनी कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता दिली नाही. त्यामुळे सत्तास्थापनेची समिकरणे धक्कादायक असू शकतात, याचे नवल वाटू नये. एकूणच शहरातील समस्या पाहता नगरपालिका पदाधिकार्यांपूढे शहर विकासाचे मोठे आव्हान राहणार आहे.
शहर जिल्ह्याचे मुख्यालय आणि राजकारणाचे सत्ता केंद्र आहे. गोंदियाच्या लोकसंख्येसह वसाहतीकरण वाढले आहे. यासह नगरवासीयांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. दर्जेदार रस्ते, मुबलक व स्वच्छ पिण्याचे पाणी, पथदिवे, आरोग्य सेवा, शिक्षण आणि अतिक्रमणमुक्त शहराची सर्वांनाच आस लागली आहे. गोंदियाचे हे ४५ शिलेदार शहरातील मूलभूत समस्यांचा वनवास संपवून विकासाची नवी पहाट आणणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणात हरविले आहे. दुकानांचे रस्त्यावर आलेले शेड, खांब आणि फलकांनी पादचार्यांची वाट अडवली आहे. विशेषतः जयस्तंभ चौक ते चांदणी चौक, जिल्हा रुग्णालय मार्ग व बाजारपेठेत जाणार्या बहुतांश मार्गावर दुकाने व हातगाडीधारकांचे साम्राज्य पसरले आहे. सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्यांवरून चालावे लागते. शहरातील मुख्य बाजारपेठेत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पार्किंग प्लाझाची सुसज्ज इमारत शोभेची ठरत आहे. दररोज हजारो गाड्या रस्त्यावर उभ्या असतात. सम-विषम तारखेचा खेळ आणि क्वचितच होणारी दंडात्मक कारवाई यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पालिका प्रशासनाने कायमस्वरुपी वाहनतळ उभारून रस्त्यांचे पाकिंगमध्ये होणारे रूपांतर थांबविण्याची नगरवासीयांची मागणी आहे. शहरात एकदोन उद्याने वगळता इतरांची अवस्था बिकट आहे.challenge of urban development या उद्यान्यांच्या पुनरुजीवनासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर येणारा ताण पाहता, पालिकेने खुल्या जागांचा विकास करून नवीन मैदाने आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे तातडीने विकसित करण्याची गरज आहे. शहराचा विस्तार झाला असला, तरी हद्दवाढ भागातील विकासाची गती ठप्प आहे. या भागात केवळ रस्ते, नाल्या बांधून चालणार नाही, तर ते दर्जेदार आणि रुंद हवेत. विस्तारीत पाणीपुरवठा योजनेचे पाणी लवकर उपलब्ध झाल्यास नागरिकांचा आर्थिक भार कमी होईल आणि पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल. मोकाट जनावरे, कुत्र्यांची वाढलेली संख्या, उघड्यावर पडणारा कचरा, नगरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न आणि सुसज्ज भाजी बाजाराची गरज आहे. बाजारपेठेत रोज हजारोच्या संख्येने लोक येतात. विशेष म्हणजे महिलांची संख्या मोठी असते. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावामुळे महिलांची कुचंबणा होते. गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उभारणे याला लोकसेवकांचे प्राधान्य असावे. शिवाय विस्कळीत भाजी बाजाराचा विकास आणि कचरा व्यवस्थापन केंद्र उभारणे अपेक्षित आहे.