नवी दिल्ली/ढाका,
India Bangladesh tension भारत आणि बांगलादेशमधील वाढत्या राजकीय व सामाजिक तणावाचा थेट परिणाम आता क्रिकेट क्षेत्रावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. आयपीएलमधून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला वगळल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बांगलादेशी क्रिकेटपटूंना बसला असून, भारतातील आघाडीची क्रीडा सौंदर्यप्रसाधने कंपनी एसजीने बांगलादेशी खेळाडूंशी असलेले प्रायोजकत्वाचे करार नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसजी कंपनी गेल्या काही काळापासून बांगलादेशचा कर्णधार लिटन दास, यासिर रब्बी आणि अनुभवी फलंदाज मोमिनुल हक यांच्यासह संघातील अनेक नामांकित खेळाडूंना प्रायोजित करत होती. मात्र, अलीकडेच हे करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याबाबत खेळाडूंना थेट कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, त्यांच्या एजंटमार्फत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे बांगलादेशी क्रिकेटपटूंना आर्थिकदृष्ट्या मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टेलिकॉम एशिया नेटकडे बोलताना एका बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितले की, येत्या काळात आणखी कंपन्या अशाच प्रकारचे निर्णय घेऊ शकतात. प्रायोजकत्वाशी संबंधित सूत्रांनीही याला दुजोरा देत, भविष्यात बांगलादेशी खेळाडूंना प्रायोजित करण्याबाबत इतर आंतरराष्ट्रीय कंपन्या सावध भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या India Bangladesh tension पार्श्वभूमीवर मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून झालेला पत्ता कटणे हा वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. बीसीसीआयच्या सूचनेनुसार कोलकाता नाइट रायडर्सने मुस्तफिजूर रहमानला मुक्त केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अधिकच वाढला. बांगलादेशात हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात संतापाची लाट उसळली होती. याच कारणावरून मुस्तफिजूरच्या आयपीएलमधील सहभागाविरोधात निदर्शनेही झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने केकेआरला त्याला सोडण्याचे निर्देश दिले.या घटनेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीकडे बांगलादेशचे भारतातील सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावत २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघाला भारतातच यावे लागेल, असे स्पष्ट केले. तसेच खेळाडूंच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी बीसीसीआयची असेल, असेही आयसीसीने नमूद केले आहे.
एकूणच, राजकीय आणि सामाजिक तणावाचा फटका क्रिकेटच्या व्यावसायिक बाजूला बसत असून, बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी हा काळ आव्हानात्मक ठरत आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिघडते की सुधारते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.