‘तुम्ही विश्वासार्ह नाही’; गाझा प्रश्नावर इजरायलने पाकिस्तानला सुनावले

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
israel-rebuked-pakistan-on-gaza इजरायलने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत गाझामध्ये अमेरिकेच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलात (ISF) पाकिस्तानी लष्कराला सहभागी होण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. हमाससोबत असलेल्या संबंधांमुळे गाझामधील पाकिस्तानची कोणतीही भूमिका संशयास्पद ठरेल, असे इजरायलचे भारतातील राजदूत रूवेन अझार यांनी ठामपणे सांगितले. अमेरिकेने सुचवलेल्या कोणत्याही गाझा स्थिरीकरण योजनेत पाकिस्तानी सैन्याचा समावेश इजरायल स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
israel-rebuked-pakistan-on-gaza
 
एका विशेष मुलाखतीत राजदूत अझार म्हणाले की, हमास आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना-विशेषतः लष्कर-ए-तैयबा-यांच्यात वाढत असलेल्या संपर्काबाबत इजरायलला गंभीर चिंता आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर विश्वास ठेवणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान गाझामधील आंतरराष्ट्रीय दलात सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिसादाची प्रतीक्षा करत असतानाच इजरायलची ही ठाम प्रतिक्रिया समोर आली आहे. israel-rebuked-pakistan-on-gaza अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझामधील शांतता प्रस्थापना आणि सत्ता हस्तांतरणाच्या सूत्रानुसार बहुराष्ट्रीय स्थिरीकरण दल तैनात करण्याची योजना मांडण्यात आली असून, त्यात सहभागी होण्याची इच्छा पाकिस्तानने व्यक्त केली होती. मात्र इजरायलने ती थेट फेटाळली आहे. राजदूत अझार यांनी स्पष्ट केले की, हमास या दहशतवादी संघटनेचा पूर्णपणे नायनाट झाल्याशिवाय गाझाच्या भवितव्याबाबत कोणतीही व्यवस्था शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत हमास निष्क्रिय न झाल्यास स्थिरीकरण दलाची संकल्पनाच निरर्थक ठरेल, असे ते म्हणाले. पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेविरोधात इजरायल प्रथमच अधिकृतपणे आणि उघडपणे पुढे आल्याने ही भूमिका पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर याच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
अलीकडील अहवालांनुसार, गाझामधील सुरक्षा आणि पुनर्बांधणीसाठी प्रस्तावित दलात योगदान देण्याबाबत अमेरिका पाकिस्तानसह अनेक देशांशी संपर्कात आहे. israel-rebuked-pakistan-on-gaza यावर प्रतिक्रिया देताना अझार म्हणाले की, अनेक देशांनी आधीच हमासविरुद्ध लढण्यासाठी आपले सैनिक पाठवण्यास नकार दिला आहे, त्यामुळे ही योजना व्यवहार्य वाटत नाही. गाझामध्ये पाकिस्तानी लष्कराची उपस्थिती इजरायल स्वीकारेल का, या थेट प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत “नाही” असे उत्तर दिले. पाकिस्तानच्या भूमिकेवर भाष्य करताना राजदूत अझार म्हणाले की, देश सहसा विश्वासार्ह राजनैतिक संबंध असलेल्या भागीदारांशीच सहकार्य करतात, आणि सध्या पाकिस्तानसोबत अशी परिस्थिती नाही. या विधानातून इजरायलचा पाकिस्तानविषयीचा गहिरा अविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. दरम्यान, अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार हमासचा वरिष्ठ कमांडर नाजी झहीर गेल्या तीन वर्षांपासून नियमितपणे पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात होता. या काळात त्याने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत अनेक बैठकाही घेतल्याचे अहवाल सांगतात. या भेटी पाकिस्तान-अधिकृत काश्मीरमध्येही झाल्याची माहिती आहे. ७ ऑक्टोबर रोजी इजरायलवर झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांतच झहीर पेशावरमध्ये असल्याचेही उघड झाले होते. या सर्व हालचालींवर इजरायली गुप्तचर संस्था बारकाईने नजर ठेवून असल्याची पुष्टी राजदूत अझार यांनी केली.