‘लेन’च्या बेशिस्तीचा बीमोड

    दिनांक :09-Jan-2026
Total Views |
 
अग्रलेख...
james lane शिस्त, संयम आणि एक निश्चित ध्येय हे कोणत्याही वाटचालीचे वैशिष्ट्य असावे लागते. शिस्त बिघडली की अपघाताची शक्यता अधिक, संयम संपला की ध्येयाविषयीचा संभ्रम वाढण्याची शक्यता अधिक आणि ध्येयाचा विसर पडला की भरकटण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच काही साध्या सूचनाही कधी कधी सुविचाराएवढ्या उपयुक्त आणि महान ठरतात. त्यामुळे वाटचालीची सुरक्षितताही निर्भर होते. महामार्गांवर किंवा लहान-मोठ्या मार्गांवरही अलिकडे एक सूचना हमखास पाहावयास मिळते. ‘लेनची शिस्त पाळा’ हे त्या सूचनेचे शब्द वाटचालीच्या पुढच्या प्रत्येक टप्प्यावरील धोक्याची जाणीव करून देतात आणि सावधगिरीही शिकवतात. ‘लेन’ची शिस्त बिघडली की अपघातांची भीती असते, हे या सूचनेवरून सूचित केले जात असल्याने, त्याकडे दुर्लक्ष झाले की, वाटचालीच्या सुरक्षिततेची शाश्वती बिघडते, हे सार्वत्रिक सत्य आहे.
 
 

जेम्स lane  
 
 
अशा साध्या सूचनांमधील श्रेष्ठ सुविचार समजून घेण्याची क्षमता समाजामध्ये आली की, शिस्त बिघडण्यामुळे होणाऱ्या अपघातांचे आणि त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हानीचे प्रमाण कमी होऊ शकते. जसे रस्त्यावरील प्रवासात किंवा वाटचालीत शिस्तीचे महत्त्व असते तसेच महत्त्व कोणत्याही क्षेत्रातील वाटचालीत असते. रस्त्यावरील प्रवासाच्या शिस्तीचे महत्त्व समजावून सांगणारी ही सामान्य सूचना अन्य सर्व क्षेत्रांतही सुविचाराइतकीच महत्त्वाची आणि मार्गदर्शक ठरत असते. साहित्य असो, कला असो, क्रीडा किंवा सामाजिक काम, राजकारण किंवा अर्थकारण या प्रत्येक क्षेत्राच्या वाटचालीत काही शिस्तबद्धपणा असणे गरजेचे असते. त्या त्या क्षेत्रामध्ये निर्धारित करून दिलेल्या मार्गिकेवरून चालत राहिल्यास त्या क्षेत्रातील वाटचालीचे ध्येय गाठणे सोपे होत असते. यालाच त्या क्षेत्रातील ‘लेनची शिस्त पाळणे’ असे म्हणता येईल. रस्त्यावरील साध्या सूचनेतून सूचित केल्या जाणाèया या सुविचाराची जेव्हा कोणत्याही क्षेत्रातील वाटचालीदरम्यान पायमल्ली होते, तेव्हा त्याची दिशा भरकटते. ध्येय साध्य करणे तर दूरच; भलत्याच परिणामांना सामोरे जाण्याची शक्यता बळावत असते. म्हणूनच कोणताही विचार सामान्य नसतो. केवळ थोरामोठ्यांनी मांडलेल्या सामान्य विचारासच सुविचार समजण्याऐवजी, सामान्य विचारातील श्रेष्ठ सुविचार समजून घेऊन त्याचे पालन केले, तर अविचारामुळे निर्माण होणाऱ्या समस्या टाळता येतात. कदाचित अविचारामुळे लेनची शिस्त सोडून एखादा ‘शॉर्टकट’ म्हणजे सोपा मार्ग शोधावयास गेले, तर एखादे वळण वाचविता येणे शक्य होतही असेल, पण असे शॉर्टकट पुढे काही समस्यादेखील निर्माण करू शकतात. विशेषतः प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा एखाद्या क्षेत्रातील आपल्या श्रेष्ठत्वाची जाणीव जगाला करून देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकटमधून समस्या कशा निर्माण होतात आणि त्या प्रतिमानिर्मितीऐवजी प्रतिमाभंजनाच्या अवस्थेस कशा कारणीभूत होतात, याचे सुरस उदाहरण जेम्स लेन नावाच्या स्वतःस इतिहास संशोधक म्हणविणाऱ्या लेखकाच्या पुस्तकामुळे सिद्ध झाले आहे. या पुस्तकाने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ भारतात अक्षरशः वैचारिक अराजक माजविले, अनेक वाद निर्माण केले आणि त्यातून सामाजिक सौहार्दाच्या समस्याही निर्माण झाल्या. ‘लेन’ नावाच्या व्यक्तीनेच ‘लेनची शिस्त’ पाळण्याच्या सामान्य सूचनेकडे दुर्लक्ष करून इतिहासाच्या क्षेत्रात केलेल्या या शॉर्टकट वाटचालीमुळे हा सामान्य विचार आता साहित्य आणि इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही सुविचाराएवढाच महत्त्वाचा ठरला आहे.
गेल्या शतकातील अखेरच्या दशकाच्या, म्हणजे 1990 च्या दशकात भारतात आलेल्या या लेखकाच्या पुस्तकामुळे माजलेल्या एका वादाचे गेल्या दोन दशकांपासून घोंघावणारे वादळ आणि त्या वादळाचे देशात धुमसत राहिलेले पडसाद हे सारे जाणून घेण्याआधी, ज्याच्यामुळे हे वादळ घोंघावत राहिले त्या जेम्स लेन नावाच्या अमेरिकन लेखकाविषयी जाणून घ्यायला हवे. 90 च्या दशकात भारतात आलेल्या या लेखकाची इतिहास संशोधक अशी ओळख होती. महाभारत या महाकाव्याचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर अधिक संशोधन करण्यासाठी हे लेखकराव भारतात दाखल झाले. त्यासाठी पुणे येथील संदर्भांनी समृद्ध असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत तळ ठोकला.james lane पुणे आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली भावना, संवेदनशीलता आणि आदरभाव पाहून लेन महाशयांना छत्रपतींच्या चरित्राचा अभ्यास करण्याच्या जाणिवांनी पछाडले व त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास सुरू केला. येथपर्यंत सारे काही ठीकच होते. छत्रपती शिवरायांचे जीवन हा जागतिक स्तरावर जिज्ञासूंच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या चरित्र व कर्तृत्वाच्या इतिहासाने जगातील अनेक नेतेही प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे लेन नावाच्या या लेखकाने शिवछत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास सुरू केला. झालेल्या आकलनानुसार त्याने एक पुस्तक लिहून काढले. पण पुस्तके लिहिणे आणि इतिहासाचे संशोधन करून त्यातील समृद्धीची स्थळे शोधणे यात फरक असतो. लेनने लिहिलेल्या पुस्तकात इतिहास कमी होताच, पण त्याच्या हेतूविषयीच शंका यावी असा मजकूरच अधिक असल्याचा आक्षेप होता. मुळात पुस्तके लिहिणे, साहित्यनिर्मिती करणे आणि संशोधनातून सिद्ध होणाऱ्या इतिहासावर भाष्य करणे या भिन्न बाबी आहेतच; त्या त्या वाटेवरून चालण्याकरिता एक निश्चित मार्गिका आखून दिली गेलेली आहे. लेन महाशयांना बहुधा त्याचा विसर पडला. त्यांनी लेनवरून चालण्याच्या शिस्तीला खो देऊन आपला मार्ग निवडला.
 
‘शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ नावाने त्याने लिहिलेले पुस्तक ऑक्सफर्ड इंडिया प्रेसने प्रकाशित केले आणि लेनची शिस्त बिघडल्याच्या जाणिवेने शिवभक्त महाराष्ट्रात वादळ उठले. सोयीस्कर मोडतोड करून इतिहासाचे विकृतीकरण करणारे हे पुस्तक मागे घ्यावे व या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी वाढू लागली आणि महाराष्ट्र उसळून उठला. जेम्सच्या पुस्तकातील तथाकथित ऐतिहासिक आधारावर प्रश्नचिन्हे उमटून पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेची मोडतोड झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना काळे फासले गेले. राज्यात सामाजिक तेढ पसरली आणि अनेक ठिकाणी तर कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उभे राहिले. त्यातच या वादात राजकारणाने उडी घेतली आणि काही राजकीय पक्षांनी या वादाचे भांडवल करून थेट निवडणुकांच्या रिंगणात तो वाद उभा केला. तेव्हापासून लेनचे वादग्रस्त पुस्तक आणि त्यातून उमटलेल्या वादाचे पडसाद आजपर्यंत महाराष्ट्रात धुमसत राहिले आहेत. या वादातून राजकारण तापले असले, तरी समाजकारण मात्र नाहक दूषित झाल्याचे पाहावयास मिळत होते. त्यामुळे या वादाचे निराकरण व्हावे आणि जेम्स लेन याच्या पुस्तकातील वादग्रस्ततेमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली अस्वस्थता संपुष्टात यावी यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांस अखेर आता यश आले आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच असे वाद शमले तर सामाजिक सौहार्द टिकून राहते. याच काळात पुढे जवळपास 20 वर्षे जेम्स लेन हा लेखक मात्र मूग गिळून गप्प राहिला होता. 20 वर्षांनंतर 2022 मध्ये लेन याने देशातील एका नियतकालिकास मुलाखत देऊन, या पुस्तकात आपण ऐतिहासिक तथ्ये मांडलेली नाहीत, असा खुलासा केला. आता या पुस्तकाच्या प्रकाशक असलेल्या ऑक्सफर्ड इंडिया प्रेसने या पुस्तकातील वादग्रस्त मजकुराविषयी जाहीर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र या प्रकाशन संस्थेने शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांना पाठविले असून माफी मागितली आहे. या प्रकाशन संस्थेने 13 फेब्रुवारी 2003 या दिवशी हे पुस्तक प्रकाशित करून प्रसिद्ध केल्यापासून महाराष्ट्रात घोंघावणाèया एका अस्वस्थ वादळाची अखेर झाली असून इतिहासाची मोडतोड करण्याच्या विकृतीपासून महाराष्ट्राची मुक्तता झाली आहे.
शिस्त, संयम आणि ध्येयाची निश्चिती नसेल तर वाटचालीची दिशा भरकटतेच; त्याचे परिणाम केवळ भरकटलेल्यालाच भोगावे लागतात, असे नाही. लेनच्या त्या वादग्रस्त पुस्तकाचे परिणाम तब्बल दोन दशकांहून अधिक काळापासून शिवभक्त महाराष्ट्रास भोगावे लागले आहेत. या विकृत लेखनामुळे राज्यात सामाजिक तेढ पसरली, विद्वेषाचे वारे वाहू लागले, राजकारणाचे रण तापले आणि या सगळ्यास कारणीभूत असलेला तो जेम्स व त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशक संस्थेत मात्र शांतताच होती. या आक्षेपार्ह मजकुरामुळे महाराष्ट्राच्या संवेदनांना धक्का पोहोचला असून शिवभक्तांच्या भावना दुखावल्या, याची कबुली प्रकाशन संस्थेने दिली आहे. शिवाजी महाराजांविषयी केलेली विधाने कोणत्याही योग्य पडताळणीशिवाय प्रकाशित केल्याची चूकही या प्रकाशकांनी मान्य केली आहे. 22 वर्षांनंतर अखेर विकृतीचा बीमोड झाला आहे आणि वाटचाल भरकटल्यानंतर होणाऱ्या हानीची जाणीव संबंधितांस झाली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे चरित्र आता निर्विवादपणे अधिक उजळले आहे.
---